धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; शिक्षण मंत्रालयासाठी अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा?

NEET प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी नेतृत्वाला संधी देण्याची मागणी
नांदेड/नवी दिल्ली| NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि त्यानंतर देशभरात उमटलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयात नेतृत्वबदलाचा विचार करावा, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे.

NEETसह विविध स्पर्धात्मक परीक्षांबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना गांभीर्याने घेत शिक्षण व्यवस्थेतील विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाचा केंद्रीय शिक्षण मंत्रालयासाठी विचार का होऊ नये, असा प्रश्नही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. मोठ्या राज्याच्या प्रशासनाचा अनुभव, प्रशासकीय कामकाजाची जाण आणि शैक्षणिक पार्श्वभूमी यामुळे अशोक चव्हाण यांना या जबाबदारीसाठी संधी दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक संदेश जाऊ शकतो, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

विज्ञान शाखेचे पदवीधर आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अशोक चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासह विविध महत्त्वाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सध्याचे आव्हान, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज आहे का? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि शिक्षण मंत्रालयासाठी पर्यायी नेतृत्वाचा विचार हा विषय आगामी काळात राजकीयदृष्ट्या अधिक चर्चेत येण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून कोणताही अधिकृत निर्णय किंवा घोषणा झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!