
वांगी| आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या वारीची अनुभूती देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वांगीच्या विद्यार्थ्यांनी ‘शिक्षणाची वारी… विठ्ठलाच्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा धारण करून टाळ, वीणा आणि मृदंगाच्या गजरात श्री विठ्ठल-रखुमाईच्या पूर्णाकृती मूर्तीसह गावातून भव्य दिंडी काढली.



महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या आषाढी महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, अभंग, लोकगीते आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.



विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून गावातील नागरिकांना पंढरपूरच्या वारीचा अनुभव मिळाला. तसेच ‘ग्रंथ दिंडी’च्या माध्यमातून शिक्षण आणि संस्कृतीचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांमुळे भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि शिक्षण यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.



या उपक्रमात केंद्र समन्वयक व्यंकट गंदपवाड, मुख्याध्यापक सारंग स्वामी, विलास कराड, गणपत मुंडकर, वैशाली कुलकर्णी आणि प्रियंका वाकडे यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोविंदराव जाधव, सरपंच दत्ता जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक जाधव, पोलिस पाटील राहुल जाधव यांच्यासह ग्रामस्थ, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तबला वादक पिंटू बोर्डे यांनीही सहभाग घेतला.


विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले. शिक्षणासोबत संस्कार, संस्कृती आणि परंपरेची जपणूक करणारी ही ‘शिक्षणाची वारी’ गावकऱ्यांसाठी आकर्षण ठरली.
