
बोलेरोची दुचाकीला समोरून धडक; एक गंभीर जखमी, हिमायतनगर–भोकर महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
हिमायतनगर, प्रतिनिधी| हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, मंगळवारी रात्री टाकराळा बु. फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. रिमझिम पाऊस सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास बोलेरो जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली.



हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथील बांधकाम मजूर व मिस्त्री दिवसभर राजवाडी परिसरात काम करून दुचाकीने गावाकडे परतत होते. त्याचवेळी हिमायतनगरकडून भोकरच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो जीपने टाकराळा फाट्याजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की दुचाकीवरील ताहेर बेग महेबूब बेग (३५) आणि शेख युनूस शेख खाजा (३४, दोघेही रा. सोनारी) यांचा जागीच मृत्यू झाला.



या अपघातात चंद्रकांत भिमराव शहाणे (२४, रा. सोनारी) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर भोकर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मृत तरुण कुटुंबातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या अचानक मृत्यूने सोनारी गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांवर सोनारी येथील मुस्लिम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


टाकराळा फाटा ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’?
या अपघातानंतर हिमायतनगर–भोकर महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. टाकराळा फाट्याजवळील वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, या ठिकाणी अद्याप पुरेसे दिशादर्शक फलक, ‘वाहने सावकाश चालवा’ यांसारखे सुरक्षा संदेश देणारे फलक अथवा आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची तक्रार आहे.


महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर भेगा पडल्या असून, काही भागांत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे सोनारीजवळ टोलवसुली सुरू असतानाही रस्ते सुरक्षा आणि देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी व नागरिकांनी केला आहे.
“आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार?” असा संतप्त सवाल उपस्थित करीत धोकादायक वळणांवर तातडीने दिशादर्शक व सुरक्षा फलक, आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर तसेच रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मृतांच्या घरी भेट देऊन शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले.
