आष्टी हायस्कूलमध्ये २३७ विद्यार्थ्यांसाठी केवळ ७ शिक्षक!

एकाच शिक्षकावर सात विषयांची जबाबदारी; विद्यार्थ्यांचा संताप, प्रतिनियुक्तीवरील शिक्षकाला परत आणण्याची मागणी
हदगाव | तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, आष्टी येथे शिक्षकांची कमतरता दिवसेंदिवस गंभीर होत असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याची तक्रार पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. २३७ विद्यार्थ्यांसाठी दहा वर्ग आणि केवळ सात शिक्षक अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याने शाळेतील अध्यापन व्यवस्था अक्षरशः ताणली गेली आहे.

या प्रश्नाकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. २२ जुलै) शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थांनी पंचायत समिती हदगावच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सन २०२२ पासून प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले विषय शिक्षक आर. बी. राठोड यांना तातडीने मूळ शाळेत परत आणावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.

‘एक शिक्षक सात विषय कसे शिकवणार?’
शाळेतील शिक्षक टंचाईची तीव्रता विद्यार्थ्यांनी माध्यमांसमोर मांडली. “एकाच शिक्षकाकडून आम्हाला तब्बल सात विषय शिकवले जात आहेत. एका शिक्षकाने सात विषय शिकवायचे आणि विद्यार्थ्यांनी ते समजून घ्यायचे कसे? प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक आवश्यक आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे आमच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे,” अशी व्यथा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या या प्रतिक्रियेतून शाळेतील शिक्षक टंचाईचे गांभीर्य स्पष्ट झाले आहे. विषयनिहाय शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून, आगामी परीक्षांच्या दृष्टीनेही त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होण्याची भीती पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

सेवानिवृत्तीमुळे संकट आणखी गडद होणार
दरम्यान, शाळेतील शिक्षक जे. के. भंडारे हे ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांची संख्या आणखी कमी होऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आधीच अपुऱ्या शिक्षकांमुळे त्रस्त असलेल्या शाळेवर आणखी एक संकट ओढवणार असल्याने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

निवेदने, बैठका झाल्या; मात्र कार्यवाही अद्याप नाही
शिक्षक टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी यापूर्वीही शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. १३ मे २०२६ रोजी निवेदन देण्यात आले होते, तर ३ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीतही हा मुद्दा मांडण्यात आला. मात्र अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी प्रतिनियुक्तीवरील शिक्षकाला तातडीने मूळ शाळेत रुजू करावे, तसेच रिक्त शिक्षक पदे त्वरित भरावीत, अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे. आता शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नावर तातडीने निर्णय घेतो का, याकडे आष्टी परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!