हजरत सांगडे सुलतान यांच्या ५९२व्या उर्साला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

संदल मिरवणुकीत विविध धर्मीय भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; कंधारमध्ये श्रद्धेचा जनसागर
कंधार, सचिन मोरे| हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा जपणाऱ्या कंधार शहरातील प्रसिद्ध सुफीसंत हजरत सय्यद शाह शेख अली सांगडे सुलतान मुष्किले आसान यांच्या ५९२व्या उर्साला गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. उर्सानिमित्त काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत विविध धर्मांतील हजारो भाविकांनी सहभागी होत श्रद्धासुमने अर्पण केली.

साधुसंतांची भूमी म्हणून कंधार शहराची महाराष्ट्रासह इतर राज्यांतही ओळख आहे. या शहराला लाभलेल्या संतपरंपरेचा प्रत्यय हजरत सांगडे सुलतान यांच्या उर्सातही पाहायला मिळतो. विविध जाती-धर्मांचे भाविक या उर्साला श्रद्धेने उपस्थित राहतात. यावर्षीही हजारो भाविकांनी दर्ग्यावर हजेरी लावत दर्शन घेतले.

सायंकाळी असरच्या नमाजानंतर साडेपाच वाजता फातेहाखानी पार पडली. त्यानंतर सज्जादानशीन सय्यद शाह अनवारूल्लाह हुसैनी राफाई कादरी यांच्या नेतृत्वाखाली दर्ग्यातून संदल मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत मिरवणूक मार्गस्थ झाली. संदलच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

हजरत सांगडे सुलतान यांच्यावर विविध धर्मांतील भाविकांची श्रद्धा असून, उर्सानिमित्त दूरवरून भाविक कंधार येथे येतात. दर्ग्याचे दर्शन घेऊन संदल मिरवणुकीत सहभागी होण्याची परंपरा भाविकांनी यंदाही कायम ठेवली.

यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार रामेश्वर गोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय भोसीकर, शिवसेनेचे प्रा. पुरुषोत्तम धोंडगे यांच्यासह स्वप्निल पाटील लुंगारे, मधुकर पाटील डांगे, राजकुमार केकाटे, महेश पिनाटे, गंगाधर कांबळे, राजहंस शहापुरे, ज्ञानोबा तिडके, संतोष कागणे, अवधूत पेठकर आदींनी दर्ग्याचे दर्शन घेतले. उर्साच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!