
दोन-तीन वेळा दुरुस्ती करूनही रस्ता पुन्हा उखडला; नागरिकांचा संताप अनावर
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| खैरगाव–मंगरूळ–वारंग टाकळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी रस्ता आता मोठी डोकेदुखी ठरत आहे. काही ठिकाणी रस्ता शोधावा लागतो, तर काही ठिकाणी खड्डे चुकवताना वाहनचालकांची अक्षरशः कसरत होत आहे. त्यामुळे ‘रस्ता कुठे आहे, की खड्ड्यांमध्येच हरवला?’ असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.



या महत्त्वाच्या मार्गाची मागील काही काळात दोन-तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच डांबर उखडून रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली होणाऱ्या कामांचा दर्जा आणि दुरुस्तीच्या कामांवर होणारा खर्च याबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.



खड्डे चुकविताना अपघाताचा धोका
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे त्यात पाणी व चिखल साचत आहे. त्यामुळे खड्ड्यांची खोली लक्षात न आल्याने दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दररोज शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि वाहनधारकांना या मार्गावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.


विशेषतः गरोदर महिला, आजारी रुग्ण आणि शाळकरी विद्यार्थ्यांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा काही दिवसांतच तो उखडत असल्याने ‘दुरुस्ती होते की केवळ निधी खर्च होतो?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.



तात्पुरत्या मलमपट्टीऐवजी कायमस्वरूपी उपायांची मागणी
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आमदार, खासदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची तातडीने पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
‘अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?’ असा संतप्त सवाल करीत नागरिकांनी तातडीने दर्जेदार व कायमस्वरूपी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा संबंधित गावांतील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
