
डावी लोकशाही आघाडी व समविचारी पक्ष-संघटनांचा केंद्र सरकारविरोधात एल्गार



नांदेड| केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी, तसेच लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जप्रकरणी केंद्र सरकारने विद्यार्थी आणि देशवासीयांची माफी मागावी, या मागणीसाठी डावी लोकशाही आघाडी व समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने नांदेड येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.



केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात तसेच राष्ट्रीय स्तरावरील पेपरफुटी, NEET गैरव्यवहार आणि शैक्षणिक संस्थांमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये जबाबदारी स्वीकारली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या सर्व प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा केंद्र सरकारने त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



“विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रातील गंभीर गैरप्रकारांवर ठोस भूमिका न घेणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध,” अशा घोषणा देत आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डीवायएफआय, एसएफआय, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, सीटू, भाकप (माले) यांच्यासह विविध मित्र पक्ष व समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.


