सोयाबीन बियाणे प्रकरणात सहा कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

नांदेड| खरीप हंगाम 2026 मध्ये जिल्ह्यातील सोयाबीन बियाणे उगवण तक्रारी आणि प्रयोगशाळेत अप्रमाणित ठरलेल्या नमुन्यांच्या प्रकरणी सहा बियाणे उत्पादक व पुरवठादार कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात यंदा 4 लाख 56 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी बियाणे निरीक्षकांनी तपासणी मोहीम राबवली होती. या मोहिमेत 751 सोयाबीन बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.

प्रयोगशाळेच्या अहवालात काही नमुने अप्रमाणित आढळून आले. तसेच बियाण्यांची उगवण न झाल्याबाबत प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी करण्यात आली. या पाहणीत बियाण्यांमध्ये दोष आढळल्याने संबंधित कंपन्यांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955, बियाणे अधिनियम, 1966, बियाणे नियम, 1968 तसेच भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हे दाखल झालेल्या कंपन्या

  • बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रा. लि., गेवराई बाजार, ता. बदनापूर, जि. जालना
  • पार्श्व जेनेटिक्स इंडिया, पेटलावाड, जि. झाबुआ (मध्य प्रदेश)
  • रवी सीड्स अँड रिसर्च प्रा. लि., इंदौर (मध्य प्रदेश)
  • एस.के.बी. सीड्स प्रा. लि., जानकी नगर, इंदौर (मध्य प्रदेश)
  • एशियन सीड्स प्रा. लि., इंदौर
  • दप्तरी ॲग्रो प्रा. लि., ता. सेलू, जि. वर्धा

ही माहिती जिल्हा परिषद कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. सदर कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, कृषी संचालक (निरीक्षण व गुणवत्ता नियंत्रण) श्री. बोरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत आणि जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच मोहीम अधिकारी सचिन कपाळे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अमोल पेकम आणि संबंधित तालुका बियाणे निरीक्षकांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!