
नांदेड| भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी 22 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत बीएलओंमार्फत वितरित करण्यात आलेली गणना पत्रे (Enumeration Form), प्राप्त झालेले अर्ज आणि डिजिटायझेशनच्या प्रगतीची माहिती देण्यात आली.



मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले की, मतदारसंघात आजअखेर गणना पत्र वाटपाचे 86 टक्के, डिजिटायझेशनचे 67 टक्के काम पूर्ण झाले असून, एकूण 72 टक्के प्रगती झाली आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, ज्या मतदारांना बीएलओंकडून गणना पत्र प्राप्त झाले आहे त्यांनी ते भरून, स्वाक्षरी करून विहित मुदतीत संबंधित बीएलओंकडे जमा करावे. वेळेत गणना पत्र जमा करणाऱ्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. मात्र, विहित मुदतीत गणना पत्र जमा न करणाऱ्या मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.



काही मतदारांची नावे Anomaly मध्ये दर्शविण्यात आली आहेत किंवा 2002 च्या मतदार यादीत नावे उपलब्ध नसल्याने काहींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा मतदारांनी कोणतीही भीती न बाळगता गणना पत्र भरून द्यावे, असे आवाहन करण्यात आले. संबंधित प्रकरणांची 8 ऑगस्ट 2026 नंतर सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेण्यात येणार असून, भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या 12 पुराव्यांपैकी कोणताही एक वैध पुरावा सादर करण्याची संधी संबंधितांना दिली जाणार आहे. वैध पुरावा सादर करणाऱ्या मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील.



तसेच, 8 ऑगस्टनंतर नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू होणार असून, नवमतदारांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले. पत्त्यात बदल करावयाचा असल्यास संबंधित मतदारांनी प्रथम सध्याच्या पत्त्यावर गणना पत्र भरून जमा करावे आणि त्यानंतर फॉर्म क्रमांक 8 द्वारे पत्त्यात दुरुस्ती करता येईल, अशी माहितीही डॉ. खल्लाळ यांनी दिली. बैठकीस सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार संजय वारकड, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा नायब तहसीलदार (निवडणूक) नितेशकुमार बोलोलु, नायब तहसीलदार संजय नागमवाड तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


