पीक विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका – तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड| प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६ अंतर्गत पीक विमा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्याव्यतिरिक्त ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) चालकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये, असे आवाहन अर्धापूरचे तालुका कृषी अधिकारी श्री. बिऱ्हाडे यांनी केले आहे.

पीक विमा अर्ज भरण्याची सुविधा ग्राहक सेवा केंद्रामार्फत विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, तालुक्यातील काही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) चालकांकडून प्रत्येक अर्जामागे सुमारे १०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. शासनाने विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेसाठी अतिरिक्त रक्कम आकारणे नियमबाह्य असून, शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही मागणीस बळी पडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

३१ जुलै अंतिम मुदत – प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२६ अंतर्गत पीक विमा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे. या मुदतीनंतर कोणतीही वाढ मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पीक विमा अर्ज भरण्यासाठी फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य करण्यात आला आहे.

यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून अनेक भागांत अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाने आगामी काळातही कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता तातडीने पीक विमा योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांना विमा संरक्षण द्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. बिऱ्हाडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!