
फेरी-९ अंतर्गत राज्यभर लसीकरण; १ कोटी लसमात्रांचे वितरण सुरू
नांदेड| राज्यातील पशुधनाचे लाळखुरकूत (एफएमडी) या घातक विषाणूजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९’ राबविण्यात येणार आहे. या मोहिमेला १३ ऑगस्ट २०२६ पासून राज्यभर सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.



मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आयव्हीबीपी संस्थेकडून प्राप्त झालेल्या १ कोटी लसमात्रांचे शीत साखळीच्या माध्यमातून सुरक्षितपणे वितरण सुरू करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेच्या कोल्ड रूममध्ये लस साठवून ठेवण्यात आली असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांपर्यंत लस वेळेत पोहोचविण्याची कार्यवाही सुरू आहे.



लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्यक्ष लसीकरण सुरू होण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक लससाठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यानुसार उपलब्ध १ कोटी लसमात्रांचे जिल्हानिहाय वितरण शीत साखळीची योग्य खबरदारी घेत करण्यात येत आहे. या वितरण प्रक्रियेचा सविस्तर जिल्हानिहाय अहवाल तातडीने मुख्य कार्यालयास सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


लसीकरणापूर्वी जंतनिर्मूलनावर भर – लसीकरण अधिक परिणामकारक होण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनाचे जंतनिर्मूलन करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक औषधांचा पुरवठा सर्व संबंधित संस्थांना करण्यात आला आहे.


दरम्यान, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खासगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना राष्ट्रीय गोकुळ अभियानांतर्गत पशुधनाचे एफएमडी लसीकरण करून त्याची नोंद NDLM वर केल्यास प्रति पशुधन ५ रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे राज्यातील कोट्यवधी पशुधनाला लाळखुरकूत रोगापासून संरक्षण मिळण्यास मदत होणार असून, पशुपालकांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येणार आहे.
“राज्यातील पशुधन रोगांपासून सुरक्षित ठेवणे आणि पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ‘लाळखुरकूत (एफएमडी) लसीकरण मोहीम फेरी-९’ अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये १३ ऑगस्टपासून ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जाईल. सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे १०० टक्के लसीकरण करून घेऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.” — डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.), आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य
पशुवैद्यकीय सेवांसाठी हेल्पलाइन : १९६२
व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा : ९०६३१४२२९९
