
जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन
नांदेड,प्रतिनिधी | हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक सुनील मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, अशी मागणी जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.



शिक्षक सुनील मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींची नावे नमूद केली होती. या प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आहेत. शिक्षण विभागातील काही अधिकारी व शिक्षकांकडून होणाऱ्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून मोरे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.



‘शिक्षकांचा मानसिक छळ थांबवा’ काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून विशिष्ट शाळांमधील विशिष्ट शिक्षकांना लक्ष्य करून त्यांच्या वर्गांची वारंवार तपासणी केली जाते. त्यानंतर जाणीवपूर्वक त्रुटी काढून कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जातात. निलंबनाची धमकी देऊन शिक्षकांचा मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप शिक्षक समन्वय समितीने केला आहे. राजकीय दबावाखाली प्रशासनातील काही अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याने शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमुळे शिक्षकांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


निष्पक्ष तपासासाठी एसआयटीची मागणी
मोरे आत्महत्या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका तपासावी. प्रकरणातील सर्व संबंधितांची चौकशी करून सत्य समोर आणण्यासाठी स्वतंत्र विशेष तपास पथकाची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी वाय. व्ही. पोवाडे, जी. एस. मंगनाळे, व्यंकट गंदपवाड, बाबूराव फसमले, विठ्ठल चव्हाण, संतोष आंबुलगेकर, बाबूराव माडगे, प्रल्हाद राठोड, तसलीम शेख, एल. बी. चव्हाण, निलेश गोधने, गजानन पाटील, मंगल सोनकांबळे, सुधाकर गायकवाड, रमेश बनकर, शिवाजी शेटकार, रमेश पवार, जी. एस. कदम, डी. एन. मंगनाळे आदी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मोरे प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार का, याकडे आता शिक्षक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


