घराघरात श्रावणबाळ घडले तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही

घराघरात श्रावणबाळ घडले तर वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही; मात्र वृद्धाश्रमही सक्षमपणे टिकले पाहिजेत – डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर

नांदेड| “घराघरात श्रावणबाळ झाले तर वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही. वृद्धाश्रम ही आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा नाही, हे विधान निश्चितच खरे आहे. मात्र ज्यांना केवळ मुली आहेत, ज्यांना अपत्य नाही किंवा विविध कारणांमुळे वृद्धावस्थेत आधार मिळत नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम हा एक महत्त्वाचा आणि सन्मानजनक पर्याय आहे. त्यामुळे वृद्धाश्रम केवळ अस्तित्वातच नव्हे तर अधिक सक्षम, संवेदनशील आणि सुसज्ज स्वरूपात टिकले पाहिजेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, साहित्यिक तथा प्रसिद्ध चिकित्सक डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांनी केले.

स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच, नांदेड यांच्या वतीने “बाबा तुमच्यासाठी…” या उपक्रमांतर्गत संध्याछाया वृद्धाश्रम, नांदेड येथे आयोजित समारोप कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध योगशिक्षक राम शिवपनोर, बोळेगावकर, आर्थिक विश्लेषक प्रदीप सोनटक्के, माध्यमशास्त्राचे अभ्यासक डॉ. शिवदास हमंद, मराठवाडा जनता विकास परिषदेचे प्रमुख पदाधिकारी डॉ. बालाजी कोम्पलवार, ज्येष्ठ विधीज्ञ डी. जी. पवार, तसेच बसवराज वडिले यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. जोशी पाटोदेकर पुढे म्हणाले की, वृद्धांच्या आयुष्यात केवळ निवारा आणि दोन वेळचे जेवण उपलब्ध करून देणे पुरेसे नसते. त्यांच्या मानसिक आरोग्याची, भावनिक गरजांची आणि सामाजिक सहभागाचीही तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे. वृद्धांना प्रेम, आपुलकी, संवाद आणि सन्मानाची गरज अधिक असते. त्यामुळे समाजाने ज्येष्ठ नागरिकांकडे केवळ दयेच्या भावनेने नव्हे तर कृतज्ञतेच्या भावनेने पाहिले पाहिजे.

स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच गेल्या दोन वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असून, मोफत दंतचिकित्सा निदान व उपचार शिबिर, शब्दोत्सव, स्वरोत्सव, ज्येष्ठांचा सन्मान अशा विविध माध्यमांतून सामाजिक बांधिलकी जपत असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. अशा उपक्रमांमुळे समाजात संवेदनशीलतेची जपणूक होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ. जोशी यांनी गोवा मुक्तिसंग्रामातील त्यांच्या विद्यार्थी अवस्थेतील धाडसी सहभागाची आठवण करून दिली. याचबरोबर हैदराबाद मुक्तिसंग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी त्या संघर्षमय इतिहासाचे प्रभावी स्मरण उपस्थितांना करून दिले. स्वातंत्र्य, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिष्ठेच्या मूल्यांची आजच्या पिढीला जाणीव करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

कार्यक्रमानिमित्त आयोजित मोफत दंतचिकित्सा निदान व उपचार शिबिरासाठी उपस्थित असलेल्या सुमारे २० दंतचिकित्सकांशी संवाद साधताना डॉ. जोशी यांनी वैद्यकीय व्यवसाय हा केवळ उपजीविकेचा मार्ग नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. ग्रामीण व दुर्लक्षित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याची जबाबदारी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाने स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर लिखित “हे बंध समाजनिष्ठेचे” या ग्रंथाला प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचा स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंचाच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी, ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण समाजसेवा, कृतज्ञता आणि संस्कारमूल्यांच्या संदेशाने भारावून गेले. कार्यक्रमाच्या शेवटी इंजिनिअर साहेबराव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!