एसजीजीएसआयई अँड टी.च्या दोन विद्यार्थ्यांची प्रतिष्ठित ‘एलएफएक्स मेंटरशिप २०२६’साठी निवड

राहुल अत्राम व तुषार पटले यांची आंतरराष्ट्रीय ओपन-सोर्स प्रकल्पांसाठी निवड; प्रत्येकी मिळणार सुमारे २.८० लाखांचे मानधन

नांदेड | श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था (एसजीजीएसआयई अँड टी.), विष्णुपुरी, नांदेडच्या संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी राहुल अत्राम आणि तुषार पटले यांची जगभरातील प्रतिष्ठित लिनक्स फाऊंडेशन एलएफएक्स मेंटरशिप प्रोग्राम २०२६ (टर्म-२) साठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

राहुल अत्राम यांची क्लाऊड नेटिव्ह कॉम्प्युटिंग फाऊंडेशन (सीएनसीएफ) – रिस्क-फाइव्ह इंटरनॅशनल अंतर्गत ‘रिस्क-फाइव्ह एक्स्टेन्शन्स लँडस्केप’ या प्रकल्पासाठी निवड झाली आहे. तर तुषार पटले यांची सीएनसीएफ – क्यूबएज अंतर्गत ‘अल्टरनेटिव्ह फॉर आयपीटेबल मॅनेजर व्हाया एपीआय सर्व्हर रिडायरेक्शन’ या प्रकल्पासाठी निवड झाली आहे.

१२ आठवड्यांची आंतरराष्ट्रीय मेंटरशिप; जागतिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या प्रतिष्ठित कार्यक्रमांतर्गत दोन्ही विद्यार्थी १२ आठवड्यांच्या आंतरराष्ट्रीय मेंटरशिपमध्ये सहभागी होणार आहेत. क्लाऊड-नेटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या ओपन-सोर्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. याशिवाय, या कालावधीत प्रत्येक विद्यार्थ्याला सुमारे ३ हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे २.८० लाख रुपये मानधन मिळणार आहे.

४० हजारांहून अधिक अर्जांतून निवड

यावर्षी लिनक्स फाऊंडेशन एलएफएक्स मेंटरशिप प्रोग्रामसाठी जगभरातून ४० हजारांहून अधिक सॉफ्टवेअर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी भारतातून केवळ १०० ते १५० विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली. या अत्यंत स्पर्धात्मक निवड प्रक्रियेत नांदेडच्या एसजीजीएसआयई अँड टी. संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश विशेष उल्लेखनीय ठरले आहे.

राहुल अत्राम आणि तुषार पटले यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी पौळ, सदस्य अमोल महामुनी, बाबा सुखविंदर सिंघजी, संजय लाठकर, सुरेशजी जोंधळे, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबईचे संचालक तथा नियामक मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद नाईक, प्रा. डॉ. विक्रम गद्रे, संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे, प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. संदीप मुंढे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. अनंत बैनवाड तसेच सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!