
शिक्षण संचालक, उपसंचालक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रकाश मारावार यांची मागणी
नांदेड, प्रतिनिधी| नांदेड जिल्ह्यात गाजत असलेल्या शिक्षक सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकारी फुटाणे यांना सहआरोपी करून तातडीने निलंबित करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी केली आहे.



या मागणीचे निवेदन शिक्षण संचालक श्री. ससाने, शिक्षण उपसंचालक श्री. मठपती आणि नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.



नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कथित अनागोंदी कारभार आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षक सुनील मोरे यांनी गेल्या वर्षभरापासून आपल्यावर होत असलेल्या कथित अन्यायाबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी फुटाणे यांच्याकडे वारंवार व्यथा मांडल्या होत्या. मात्र, त्यावर योग्य तोडगा काढण्याऐवजी त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन निलंबनाची धमकी देण्यात आल्याचा आरोप प्रकाश मारावार यांनी केला आहे.


‘वाद मिटविण्याऐवजी प्रकरणाला खतपाणी’ – शिक्षक सुनील मोरे आणि संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्यातील वाद सोडविण्याची जबाबदारी शिक्षण विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची होती. मात्र, या प्रकरणात मध्यस्थी करून तोडगा काढण्याऐवजी प्रकरण अधिक चिघळण्यास कारणीभूत ठरणारी भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षण विभागातील कथित आर्थिक देवाणघेवाण, बेजबाबदारपणा आणि उर्मट कारभारामुळे विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोपही मारावार यांनी केला आहे.
‘दोषींवर कठोर कारवाई करा’ – सुनील मोरे यांच्या आत्महत्येप्रकरणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका निष्पक्षपणे तपासावी. प्राथमिक शिक्षणाधिकारी फुटाणे यांना या प्रकरणात सहआरोपी करून तातडीने निलंबित करावे आणि दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश मारावार यांनी केली आहे.
शिक्षकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि प्रशासकीय पातळीवर प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.


या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता नांदेड जिल्ह्यातील शिक्षक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
