मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माहूरमध्ये भाविकांसाठी सुविधांचे लोकार्पण

श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात १० स्टेनलेस स्टील खुर्च्या व १० टेबलची सुविधा

नांदेड/माहूर, प्रतिनिधी| महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माहूर येथील श्री जगदंबा देवी मंदिर परिसरात भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांचा लोकार्पण सोहळा बुधवार, २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. चैतन्य बापू देशमुख यांच्या पुढाकारातून मंदिर परिसरात १० स्टेनलेस स्टील खुर्च्या आणि १० टेबल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या समाजोपयोगी उपक्रमाचा लोकार्पण सोहळा भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुनील राणे यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, आमदार भीमराव केराम आणि जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

माहूर येथील श्री जगदंबा देवी मंदिरात दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर भाविकांना विश्रांतीची सोय मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या संकल्पनेतून भक्तसेवेचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. धार्मिक स्थळांचा विकास, भाविकांच्या सुविधा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन यांना प्राधान्य देण्याच्या विचारांशी हा उपक्रम सुसंगत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या लोकार्पण सोहळ्यास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!