
कार पळविण्याचा प्रयत्न फसला, एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
गोपनीय माहितीवरून सापळा; विमल, रजनीगंधा पानमसाला व तंबाखूचा मोठा साठा जप्त
कंधार, सचिन मोरे| नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. कंधार पोलिसांनी डिग्रस (बु.) मार्गावर कारवाई करत ₹8 लाख 88 हजार 640 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा मुद्देमाल जप्त केला आहे.



या कारवाईत एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्या साथीदाराविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.



पोलिसांचा इशारा मिळताच कार भरधाव पळवली! – १९ जुलै रोजी कंधार पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, एक व्यक्ती चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची वाहतूक करीत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी डिग्रस (बु.) रोड परिसरात सापळा रचला. काही वेळातच टोयोटा इटिओस कार क्रमांक MH-48-BH-0634 संशयास्पद रीत्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने पोलिसांना हुलकावणी देत कार भरधाव वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून वाहन अडविले आणि चालकाला ताब्यात घेतले.
कारच्या झडतीत गुटख्याचा मोठा साठा – पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. विमल पानमसाला व गुटखा — ₹3,05,760, तंबाखू — ₹1,31,040, रजनीगंधा सुगंधित पानमसाला — ₹25,920, रजनीगंधा पानमसाला — ₹25,920, टोयोटा इटिओस कार — ₹4,00,000, एकूण जप्त मुद्देमाल : ₹8,88,640 असा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल – या प्रकरणी अमर संजय कांबळे (वय २६, रा. डिग्रस बु., ता. कंधार) आणि बाळू वडजे (रा. डिग्रस बु., ता. कंधार) यांच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास कंधार पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे आणि पोलीस अंमलदार प्रकाश टाकरस, एकनाथ घुगे, कामवाड यांच्या पथकाने केली. प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करणाऱ्यांवर कंधार पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


