
कामारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात कारवाईची मागणी; सात दिवसांत चौकशीचे आश्वासन
हिमायतनगर, अनिल मादसवार| मौजे कामारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कारमोड सर यांच्याविरोधात तात्काळ शिस्तभंगाची व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिगंबर विठ्ठलराव शिरफुले व वैभव प्रकाशराव नरवाडे यांनी २१ जुलै २०२६ पासून शाळेच्या प्रांगणात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.



या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, उपशिक्षणाधिकारी यांच्या वतीने आंदोलकांना लेखी आश्वासन देण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या आत नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.



या लेखी आश्वासनाची प्रत संबंधित अधिकाऱ्यांकडून स्वीकारताना उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या साक्षीने आंदोलकांनी प्रशासनावर विश्वास व्यक्त केला. लोकशाही मार्गाचा सन्मान राखत आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.


सात दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा – दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या सात दिवसांच्या मुदतीत ठोस व समाधानकारक कार्यवाही झाली नाही, तर पुन्हा अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे.

‘लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून उपोषण स्थगित केले आहे; मात्र आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही, तर पुढील आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील,’ असा इशाराही आंदोलकांनी दिला. आता प्रशासनाकडून सात दिवसांत नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे कामारी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


