
तक्रारदाराच्या कुटुंबातील लाभार्थीवरही निधी हडपल्याची तक्रार, शहापूर ग्रामस्थांकडून सखोल चौकशीची मागणी



शहापूर/ देगलूर, गंगाधर मठवाले| प्रधानमंत्री आवास योजना आणि मोदी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम न करताच काही लाभार्थ्यांनी अनुदानाची रक्कम उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी लेखी मागणी शहापूर येथील गंगाधर मठवाले यांनी गटविकास अधिकारी, देगलूर यांच्याकडे केली आहे.



शहापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोदी आवास योजनेंतर्गत एकूण ८५ घरकुलांचे वाटप करण्यात आले होते. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या टप्प्यानुसार अनेक लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र, काही लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम न करताच अनुदानाची रक्कम उचलल्याची तक्रार करण्यात आली आहे.


यापूर्वी हनमलू पोतदार यांनी घरकुल बांधकामासंदर्भात तक्रार केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी ३८ घरकुल लाभार्थ्यांना नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे. बांधकाम न केलेल्या लाभार्थ्यांनी शासनाकडून मिळालेली घरकुलाची रक्कम परत करावी, असे नोटिसीत नमूद करण्यात आल्याचे सांगण्यात येते.


दरम्यान, तक्रारदारांकडून काही लाभार्थ्यांवर घरकुलांचे बांधकाम न करताच निधी लाटल्याचा आरोप करण्यात आला असताना, तक्रारदारांच्या कुटुंबातीलच एका लाभार्थ्याने घरकुलाचे बांधकाम न करता निधी घेतल्याचा प्रतिआरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ‘भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांच्याच कुटुंबातील लाभार्थ्यावरही निधी हडपल्याचा आरोप’ अशी चर्चा गावात सुरू झाली आहे.

मात्र, संबंधित लाभार्थ्यांनी शासनाकडून मिळालेल्या अनुदानासोबत स्वतःच्या निधीतून घरबांधणी केली असल्याचेही ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती काय आहे, हे प्रशासनाच्या प्रत्यक्ष चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
केवळ राजकीय किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप न होता, प्रशासनाने कोणत्याही अफवा अथवा चर्चांना महत्त्व न देता प्रत्यक्ष गावात जाऊन घरकुलांची पाहणी करावी, कागदपत्रांची तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी शहापूर येथील ग्रामस्थांनी केली आहे.
