
कटरा ते अमृतसर… देशभक्ती, सहप्रवास आणि अविस्मरणीय क्षण



काल वैष्णोदेवीचे दर्शन घेताना सर्व यात्रेकरूंनी अक्षरशः आपल्या क्षमतेची परीक्षा दिली होती. डोंगर चढणे, दर्शनासाठी रांगेत उभे राहणे आणि पुन्हा परतीचा प्रवास यामुळे जवळपास सर्वच जण थकले होते. म्हणूनच यावेळी मी मुद्दाम एक वेगळा निर्णय घेतला. अमृतसरला जाण्यासाठी बसेस नेहमीपेक्षा थोड्या उशिरा, म्हणजे दुपारी बारा वाजता बोलावल्या. सर्वांना रात्रीची झोप पूर्ण करता यावी आणि सकाळी निवांत उठता यावे, एवढाच त्यामागचा हेतू होता. पण सकाळी उठून पाहतो तर काय, बरेच जण सात वाजण्यापूर्वीच तयार! सीनियर सिटीजन कितीही म्हटले तरी त्यांच्या अंगची लवकर उठण्याची सवय काही जात नाही, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.



आजच्या सकाळच्या नाश्त्याचे प्रायोजक होते उमरीचे भगवानशेठ आसवा. काही वर्षांपूर्वी ते आमच्यासोबत अमरनाथ यात्रेला आले होते. त्यांच्या वतीने सर्वांसाठी गरमागरम पोहे, उपमा आणि चहाची व्यवस्था करण्यात आली होती. अवघ्या साठ रुपयांत मिळणारा हा भरपेट नाश्ता इतका स्वादिष्ट होता की, यात्रेकरूंनी मनापासून त्याचा आस्वाद घेतला. नाश्ता झाल्यावर सर्वांनी थोडी विश्रांती घेतली आणि प्रस्थानाची तयारी सुरू झाली.


दुपारचे बारा वाजले तरी आमच्या एसी बसेस हॉटेलवर पोहोचल्या नव्हत्या. चौकशी केली असता समजले की, मोठ्या बसेसना हॉटेलसमोर येण्यास पोलिसांनी मनाई केली होती. मी आणि माझ्यासोबतचा एक सहकारी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडे गेलो. त्यांनी वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगितले. मग वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विशेष परवानगी घेतली. परवानगी मिळाल्यावर बसेस निघाल्या; मात्र त्यांच्या लांबीमुळे ड्रायव्हरने गाडी हॉटेलपर्यंत आणणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे सामान एका ठरावीक ठिकाणी आणावे लागणार होते.


आधीच नांदेडहून आणलेल्या मोठमोठ्या बॅगा, त्यात कटऱ्यातील खरेदीमुळे वाढलेले अतिरिक्त सामान… प्रत्येक यात्रेकरूला एवढे ओझे उचलणे शक्य नव्हते. अखेर हजार रुपये प्रति फेरी या दराने छोटा हत्ती ठरवला. तब्बल चार फेऱ्या करून सर्व सामान बसेसमध्ये चढवण्यात आले. व्यवस्थापन म्हणजे फक्त नियोजन नव्हे, तर परिस्थितीनुसार क्षणार्धात योग्य निर्णय घेण्याची कला असते, याचा पुन्हा एकदा अनुभव आला. जम्मू–कटरा–अमृतसर या भागातील प्रचंड उष्णतेचा विचार करून मी दरवर्षीप्रमाणे याही वेळी एसी बसेसचीच व्यवस्था केली होती. दुपारी दीडच्या सुमारास आमचा ताफा अमृतसरच्या दिशेने मार्गस्थ झाला.
प्रवास लांबचा असल्यामुळे सर्वांचा वेळ आनंदात जावा म्हणून मी नेहमीप्रमाणे “समोसा-कचोरी” हा लोकप्रिय खेळ सुरू केला. विजेत्यास माझ्याकडून पाचशे रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. या खेळाची गंमत अशी की, शेवटी फक्त एकच जण जिंकतो आणि बाकी सर्व जण हसत-खेळत बाद होतात. जो बाद होईल त्याने विनोद सांगायचा, गाणे म्हणायचे किंवा नाच करून दाखवायचा. ज्यांना तेही जमत नसेल त्यांनी पन्नास रुपये दंड भरायचा. मात्र “भाऊ है तो मुमकिन है” या न्यायाने एक खास सवलतही ठेवली होती—एक उठाबशी काढली की सर्व शिक्षा माफ! तेरा वर्षांच्या मुलापासून ते सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ यात्रेकरूपर्यंत सर्वांनी या खेळात उत्साहाने भाग घेतला. प्रत्येक बाद होणाऱ्या व्यक्तीवर मी एखादा मिश्किल विनोद करायचो आणि संपूर्ण बस हास्यकल्लोळाने दणाणून जायची. मध्ये एका ठिकाणी बस थांबल्यावर अमरनाथचे जुने यात्रेकरू भारत ढगे सर यांनी सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली. पुन्हा खेळ सुरू झाला आणि गप्पा, हशा, टाळ्या यामध्ये अमृतसर कधी आले हे कोणालाच कळले नाही.
अमृतसरमध्ये यात्रेकरूंसाठी तीन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वजण आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन फ्रेश झाले. रात्रीच्या भोजनाचे प्रायोजक होते किनवटचे समाजसेवक मुसाखान. त्यांच्या वतीने उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभराचा प्रवास आणि थकवा क्षणात विसरायला लावणारे ते प्रेमळ आदरातिथ्य सर्वांच्या कायम स्मरणात राहील.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता दोन एसी बसेस पुन्हा आमच्या सेवेसाठी सज्ज होत्या. सर्वप्रथम आम्ही दुर्ग्याना मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर जालियनवाला बागेत प्रवेश करताच प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. त्या पवित्र भूमीवर उभे राहून जनरल डायरने केलेल्या अमानुष नरसंहाराची आठवण मन सुन्न करून गेली. निष्पाप स्वातंत्र्यसैनिकांच्या रक्ताने पावन झालेली ती माती पाहताना स्वातंत्र्य किती मोठ्या त्यागातून मिळाले आहे याची तीव्र जाणीव प्रत्येकाला झाली.
तेथून आम्ही सुवर्ण मंदिराकडे रवाना झालो. अमृतसरचे माझे पत्रकार मित्र चरणजितसिंघ अरोरा यांनी आमच्यासाठी विशेष दर्शनाची व्यवस्था केली होती. गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या वतीने आमच्या काही प्रमुख यात्रेकरूंचा धार्मिक ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. गरमागरम पकोडे आणि चहाचा आस्वाद घेतल्यानंतर सर्वांनी एकत्रित छायाचित्र काढले आणि सुवर्ण मंदिरात मत्था टेकवून गुरूंचे आशीर्वाद घेतले.
दुपारच्या जेवणासाठी नेहमीप्रमाणे शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या प्रसिद्ध कुलवंतसिंग कुलचेवाले यांच्या स्वादिष्ट कुलच्यांचा बेत ठेवला होता. या भोजनासाठी द्वारकादास अग्रवाल, रामेश्वर वाघमारे, प्राचार्य सुधीर शिवणीकर आणि उपप्राचार्य अजयकुमार संगेवार यांनी उदारपणे प्रायोजकत्व स्वीकारले. पनीर, आलू, गोबी आणि मिक्स कुलच्यांचा मनसोक्त आस्वाद घेतल्यानंतर सर्वांनी या चारही अन्नदात्यांचे फोनवरून मनापासून आभार मानले. दुपारी साडेतीनच्या सुमारास आम्ही अटारी बॉर्डरकडे निघालो. अनेकजण आजही याला वाघा बॉर्डर म्हणतात; मात्र वाघा हे गाव पाकिस्तानात असून अटारी हे भारतातील गाव असल्यामुळे केंद्र सरकारने अधिकृतपणे ‘अटारी बॉर्डर’ हे नाव प्रचलित केले आहे.
आम्ही पोहोचेपर्यंत भारतीय बाजूचे संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले होते. मात्र गोल्डन टेम्पलमार्फत माझ्या नावाने आधीच 100 व्हीआयपी पासची व्यवस्था झाल्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण आली नाही. आमच्या बसेसना शेवटच्या व्हीआयपी पार्किंगपर्यंत प्रवेश मिळाला. तिथे पन्नास साठ कार मध्ये फक्त आमच्या दोन बसच उभ्या होत्या. कडक सुरक्षा तपासणीनंतर आम्ही थेट सीमेजवळील आसनांवर जाऊन बसलो. भारताच्या बाजूला एकही जागा रिकामी नव्हती, तर पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये सुरुवातीला मोजकेच लोक दिसत होते. नंतर हळूहळू काही प्रेक्षक आले, पण त्यांचे स्टेडियम दहा-वीस टक्क्यांपेक्षाही जास्त भरले नाही.
समारंभ सुरू होण्यापूर्वी देशभक्तीपर गीतांवर आमच्या महिला यात्रेकरूंनी उत्स्फूर्त नृत्य सादर केले. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “हिंदुस्तान जिंदाबाद” या घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले. दोन्ही देशांच्या जवानांची शिस्तबद्ध कवायत, सीमारेषेवरचा तो दिमाखदार सोहळा आणि अखेरीस एकाच वेळी दोन्ही राष्ट्रध्वज खाली उतरवण्याचा क्षण… प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान भरून टाकणारा तो अविस्मरणीय अनुभव होता.
रात्री नेहमीप्रमाणे अरोरा पॅलेसमध्ये माझे जुने मित्र सरदार जागीरसिंघ यांच्या वतीने राजेशाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. ते स्वतः अमेरिकेत असल्यामुळे त्यांची मुलगी कमलदीप कौर व जावई जसपालसिंघ यांनी अत्यंत आत्मीयतेने सर्व व्यवस्था सांभाळली. याच ठिकाणी यात्रेदरम्यान विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यात्रेकरूंना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रेम, आपुलकी, समाधान आणि देशभक्तीच्या भावनेने परिपूर्ण असा हा दिवस संपला आणि आम्ही पुन्हा हॉटेलकडे परतलो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान होते… कारण अमरनाथ यात्रेच्या या प्रवासात अध्यात्माबरोबरच इतिहास, संस्कृती, मैत्री आणि राष्ट्रप्रेम यांचाही अनमोल ठेवा प्रत्येकाच्या मनात कायमचा साठवला गेला होता. (क्रमश:)
