
पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन; सुकत चाललेल्या खरीप पिकांना मिळाले जीवदान



हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात आणि ठिकठिकाणी देवदेवतांना पावसासाठी घातलेल्या साकड्यानंतर शनिवारच्या रात्रीपासून तालुक्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाली. श्री मारोतीराया आणि पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने पावसाची दमदार सुरुवात झाल्याची भावना शेतकरी व नागरिक व्यक्त करीत आहेत.



पावसाने दडी मारल्याने शेतातील खरीप पिके सुकू लागली होती. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिके वाचविण्याची धडपड सुरू केली होती, तर बहुतांश शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करीत होते.



पाऊस पडावा आणि यंदाचा खरीप हंगाम सुगीचा जावा, यासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये महापूजा, आराधना, अन्नदानाच्या पंगती आणि विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. व्यापारी, शेतकरी, मजूरदार महिला पुरुष नागरिकांनी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी देवदेवतांना साकडे घातले. कुठे महिलांनी पैनगंगा नदीवरून पायी चालत डोक्यावर पाणी आणून देवी देवतांना जलाभिषेक केला तर कुठे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले काही ठिकाणी अन्नदानाच्या पंगती करण्यात आल्या.


अखेर शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे सुकत चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसाने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हळद यासह सर्वच खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, दुबार पेरणीच्या संकटाची टांगती तलवार काही प्रमाणात दूर झाली आहे.
पावसाअभावी पशुपक्षी, प्राणी आणि मानवही हैराण – दरम्यान, पावसाने ओढ दिल्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर पशुपक्षी, प्राणीमात्र आणि सर्वसामान्य नागरिकही उकाडा व पाणीटंचाईच्या भीतीने हैराण झाले होते. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिली असती, तर आगामी काळात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कशी करायची, याची चिंता नागरिकांना सतावत होती.
मात्र, ‘सर्वांची चिंता त्या ईश्वराला असते,’ या भावनेने पावसासाठी ठिकठिकाणी पूजा, अन्नदानाच्या पंगती आणि धार्मिक उपक्रम करणाऱ्या नागरिकांनी पावसाच्या आगमनाचे स्वागत केले. ईश्वराने मानव, पशुपक्षी आणि सजीवसृष्टीची दखल घेत कृपादृष्टी केली, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पावसाच्या आगमनाने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले असून, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पावसाची ही कृपादृष्टी अशीच कायम राहावी, शेतशिवारात भरघोस पीक यावे आणि बळीराजाच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना नागरिकांकडून श्री मारोतीराया आणि विठुरायाच्या चरणी केली जात आहे. ‘पाऊस आला… पिकांना जीवदान मिळाले; आता खरीप हंगाम सुगीचा होऊ दे!’ अशी भावना शेतकरी व्यक्त केली जात आहे.
