गोदावरी नदीतील कार दुर्घटनेला हत्येचे गूढ वळण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

घटनेच्या एक दिवस आधी दोन्ही मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडला होता सुनील मोरे; एसडीपीओ प्रशांत शिंदे यांची माहिती
नांदेड | गोदावरी नदीत कार कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आता गंभीर आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे मानले जात असताना, दोन्ही मुलांच्या शवविच्छेदन अहवालातून खुनाचा प्रकार उघड झाल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांनी दिली.

विशेष म्हणजे, घटनेच्या एक दिवस आधीच सुनील मोरे हे आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन घराबाहेर पडले होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे घटनेपूर्वी नेमके काय घडले, ते कुठे गेले होते, कोणाच्या संपर्कात होते आणि त्यानंतर परिस्थितीने कोणते वळण घेतले, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

घटनेनंतर पोलिसांनी विविध बाजूंनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान समोर आलेल्या बाबी, तसेच मुलांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होईल, असे एसडीपीओ प्रशांत शिंदे यांनी सांगितले.

घटनेच्या मुळाशी जाण्याची गरज
मुलांच्या शवविच्छेदन अहवालातून खुनाचा प्रकार स्पष्ट झाल्याने तपास यंत्रणेसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. केवळ कार नदीत कोसळण्याच्या घटनेपुरता तपास मर्यादित न ठेवता, घटनेच्या एक दिवस आधीपासूनची प्रत्येक हालचाल, संपर्क आणि घटनाक्रम तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

सुनील मोरे आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय? घटनेपूर्वी नेमके काय घडले? या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिस तपासातूनच समोर येणार आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे नांदेड परिसरात खळबळ उडाली असून, प्रकरणाच्या तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. घटनेच्या संपूर्ण मुळाशी जाऊन सत्य बाहेर आणण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!