
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक; शिक्षकांना निपुण भारत व PAT संदर्भात मार्गदर्शन
हदगाव/नांदेड, प्रतिनिधी| पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल, हदगाव येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी सदिच्छा भेट देत शाळेची पाहणी केली. त्यांच्या या भेटीमुळे शाळेच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा मिळण्यासोबतच विद्यार्थी आणि शिक्षकांना नवी प्रेरणा मिळाली.



डॉ. वसेकर यांच्यासोबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), नांदेडचे प्राचार्य अमोल निळेकर, वरिष्ठ अधिव्याख्याता बालाजी शेळके आणि अधिव्याख्याता शिवाजी साखरे उपस्थित होते.



या भेटीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे डॉ. वसेकर यांचे वडील सन १९७१ ते १९७७ या कालावधीत याच शाळेत राजपत्रित मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्या काळात डॉ. वसेकर यांचे बालपण हदगावमध्ये गेले. अनेक वर्षांनंतर आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांची भेट घेतली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.


विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेने भारावले – डॉ. वसेकर यांनी इयत्ता दहावी (उर्दू माध्यम) आणि इयत्ता सहावी (मराठी माध्यम) वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली रोबोटिक्स कार त्यांनी स्वतः चालवून पाहिली. विद्यार्थिनींनी शिवणकलेतून तयार केलेले कपडे सादर केले, तर मायक्रॉन आर्टच्या माध्यमातून तयार केलेला आकर्षक कंदील विद्यार्थिनींनी त्यांना भेट दिला.
विद्यार्थ्यांनी डॉ. वसेकर यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, सर्जनशीलता आणि सादरीकरण पाहून त्यांनी विद्यार्थ्यांसह शाळेचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या आवडी-निवडी आणि भविष्यातील ध्येयांविषयीही त्यांनी संवाद साधला.


इयत्ता सहावीच्या वर्गशिक्षिका श्रीमती रतन कराड यांच्या ‘सुलभ मराठी व्याकरण’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. हेमंत वसेकर, DIETचे प्राचार्य डॉ. अमोल निळेकर आणि गटशिक्षणाधिकारी संग्राम कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत तयार केलेले विणकाम साहित्य पाहून डॉ. वसेकर यांनी समाधान व्यक्त केले.
‘माझा अभ्यास–माझी प्रगती’ या आनंददायी उपक्रमांतर्गत ‘प्रश्नोत्तरांची टोपी’ या उपक्रमाचे सादरीकरणही करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून डॉ. वसेकर यांनी विद्यार्थ्यांसह सहशिक्षिका रतन कराड यांचे कौतुक केले. निपुण अॅप आणि दीक्षा अॅपबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासपूर्ण प्रतिसाद पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच रतन कराड यांना पीएच.डी. पदवीबद्दल शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांना निपुण भारत व PAT संदर्भात मार्गदर्शन – यानंतर आयोजित मार्गदर्शन सत्रात डॉ. हेमंत वसेकर यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले. निपुण भारत अभियान आणि PAT (Periodic Assessment Test) मधील बदलांविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्यांचा विकास घडविण्यासाठी अभिनव उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
शाळेच्या शैक्षणिक व विद्यार्थी विकास उपक्रमांसाठी डॉ. वसेकर यांनी पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. एस. जी. चितळे आणि शेख इरफान यांच्या हस्ते डॉ. हेमंत वसेकर यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक एजाज तांबोळी यांनी उपस्थित मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले.
माजी विस्तार अधिकारी नंदकुमार कवठेकर यांनी १९७७ मध्ये याच शाळेचे विद्यार्थी म्हणून घेतलेल्या शिक्षणाच्या आठवणी सांगत डॉ. वसेकर यांच्या वडिलांच्या मुख्याध्यापकपदाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पऊळ सर यांनी केले, तर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, हदगाव संग्राम कांबळे यांनी समारोपाचे भाषण केले. उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
डॉ. हेमंत वसेकर यांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूलच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा मिळाला असून, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली आहे.
