
“राष्ट्र संसदेत घडत नाही; ते प्रत्येक घरात घडते. आणि घर घडते ते आईच्या मायेने, वडिलांच्या त्यागाने आणि संस्कारांच्या अखंड परंपरेने.”



आज भारत महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, अवकाश संशोधन, अर्थव्यवस्था आणि डिजिटल क्रांती यांमध्ये भारताने अभूतपूर्व प्रगती केली आहे. परंतु या विकासाच्या प्रवासात एक प्रश्न सातत्याने अस्वस्थ करतो—ज्यांच्या खांद्यावर उद्याचा भारत उभा राहणार आहे, त्या पिढीचे चारित्र्य कोण घडविणार?



उत्तर स्पष्ट आहे—कुटुंब संस्था.
कुटुंब ही केवळ रक्ताच्या नात्यांची चौकट नाही; ती संस्कृतीचा श्वास आहे, मूल्यांचे विद्यापीठ आहे आणि राष्ट्रनिर्मितीची पहिली प्रयोगशाळा आहे. म्हणूनच मानवी इतिहासात राज्य, न्याय, शिक्षण किंवा अर्थव्यवस्था यांच्याही आधी कुटुंब संस्थेचा जन्म झाला.


मानवाने भटक्या जीवनातून स्थिर जीवनाकडे वाटचाल केली, शेतीचा शोध लावला आणि सुमारे दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी नवाश्मयुगात कुटुंब व्यवस्थेचे स्थिर स्वरूप निर्माण झाले. त्यानंतर विवाहसंस्था, जबाबदाऱ्या, वारसा, सामाजिक नियम आणि संस्कार यांचा विकास झाला. याच पायावर सभ्यता उभी राहिली.


भारतीय संस्कृतीने या व्यवस्थेला सर्वोच्च स्थान दिले. “मातृदेवो भव, पितृदेवो भव” ही केवळ धार्मिक शिकवण नाही; ती समाजव्यवस्थेची शाश्वत जीवननीती आहे.
राष्ट्रनिर्मितीचा विस्मरणात गेलेला पाया
आज विकासाच्या चर्चा मोठ्या आहेत; परंतु चारित्र्यनिर्मितीचा विषय दुय्यम ठरला आहे. आपण शाळा वाढवल्या, पण संस्कारशाळा कमी झाल्या. शिक्षण वाढले, पण मूल्यांचे शिक्षण कमी झाले. मोबाईल हातात आला, पण मुलांचा हात धरून चालणारे वडील कमी झाले. पैसा वाढला, पण कुटुंबातील संवाद कमी झाला.
आज समाजात दिसणारी हिंसा, व्यसनाधीनता, नैतिक अधःपतन, वृद्धांची उपेक्षा, तुटणारी नाती आणि वाढती मानसिक अस्थिरता ही केवळ कायद्याची समस्या नाही; ती कुटुंब व्यवस्थेच्या कमकुवत होत चाललेल्या पायाची चिन्हे आहेत.
वडील : राष्ट्राचा नि:शब्द शिल्पकार – आई जीवन देते; वडील जीवनाला दिशा देतात. वडील हे केवळ कमावते नसतात. ते संस्कारांचे शिल्पकार, कर्तव्याचे शिक्षक, प्रामाणिकपणाचे आदर्श आणि स्वाभिमानाचे रक्षक असतात. त्यांच्या त्यागाचा आवाज नसतो; पण त्यांच्या कष्टांवर अनेक पिढ्यांचे भविष्य उभे असते.
“बाबा… तुमच्यासाठी!” घोषणेपासून कृतीपर्यंत – याच सामाजिक वेदनेतून चळवळी योद्ये स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच, नांदेड या माध्यमातून “बाबा… तुमच्यासाठी!” हा राष्ट्र उभारणीसाठी सहाय्यक उपक्रम सुरू केला आहे.
हा उपक्रम केवळ पित्याचा गौरव करण्यासाठी नाही; तर कुटुंब संस्था, संस्कार, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मिती यांना पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे “प्रथम केले, मग सांगितले.” समाजाला उपदेश देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून संदेश देण्याची भूमिका या उपक्रमाने स्वीकारली आहे.
२० जुलै २०२६ : समाजजागृतीचा त्रिवेणी संगम – सोमवार, दिनांक २० जुलै २०२६ रोजी स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच, नांदेड यांच्या वतीने दिवसभर तीन स्वतंत्र पण परस्परांशी जोडलेली सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
पहिले सत्र – वृक्षारोपण
सकाळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे. ज्या वृक्षाप्रमाणे मुळे मजबूत असतील तरच तो वृक्ष उंच वाढतो, त्याचप्रमाणे कुटुंबाचे संस्कार मजबूत असतील तरच राष्ट्र उंच भरारी घेते. पर्यावरण आणि संस्कार यांचे नाते एकाच जीवनमूल्याशी जोडलेले आहे—भविष्यासाठी जबाबदारी.
दुसरे सत्र – संध्याछाया वृद्धाश्रमात मोफत दंतचिकित्सा, निदान व उपचार शिबिर
दुपारी संध्याछाया वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत दात तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी कष्ट केले, त्यांच्याच वृद्धापकाळात होणारी उपेक्षा ही आधुनिक समाजाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. वृद्धांचा सन्मान म्हणजे केवळ सेवा नव्हे; ती भारतीय संस्कृतीची पुनर्स्थापना आहे. वृद्धाश्रमात सेवा देणे म्हणजे मानवतेपुढे नतमस्तक होणे.
तिसरे सत्र – कलाकार शब्दोत्सवातील सहभागींचा सन्मान – सायंकाळी पित्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या “कलाकार आणि शब्दोत्सव”मध्ये सहभागी झालेल्या साहित्यिक, कलाकार, आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
कारण संस्कृती जिवंत ठेवणारे कलाकार आणि साहित्यिक हे समाजाचे नैतिक दिशादर्शक असतात. ज्या समाजात कला, साहित्य आणि संस्कार यांचा सन्मान होतो, तो समाज कधीही वैचारिकदृष्ट्या दरिद्री होत नाही.
हा कार्यक्रम नव्हे, सामाजिक चळवळ आहे – या तीनही सत्रांकडे स्वतंत्र कार्यक्रम म्हणून पाहणे ही मोठी चूक ठरेल. वृक्षारोपण म्हणजे भविष्यासाठी आशा. वृद्धसेवा म्हणजे भूतकाळाप्रती कृतज्ञता. कलाकारांचा सन्मान म्हणजे संस्कृतीचे जतन. ही तिन्ही सूत्रे एकत्र आली की समाज, संस्कृती आणि राष्ट्र यांचा त्रिवेणी संगम घडतो. राज्य आणि देशासाठी आदर्श ठरण्याची क्षमता आज प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक गावात अशा कृतीप्रधान उपक्रमांची आवश्यकता आहे.
जर प्रत्येक सामाजिक संस्था वर्षातून एक दिवस वृक्षारोपण, वृद्धसेवा आणि संस्कृती संवर्धनासाठी समर्पित करू लागली, तर शासनाच्या योजनांनाही नवी ऊर्जा मिळेल आणि समाजात स्वयंप्रेरणेची लाट निर्माण होईल.
“बाबा… तुमच्यासाठी!” हा उपक्रम नांदेडपुरता मर्यादित राहू नये. तो महाराष्ट्रासाठी प्रेरणा आणि भारतासाठी आदर्श ठरावा, अशी अपेक्षा आणि भूमिका आहे. कारण राष्ट्र बदलण्यासाठी नेहमी मोठ्या क्रांतींची गरज नसते; समाजाला दिशा देणाऱ्या छोट्या पण सातत्यपूर्ण कृतीच इतिहास घडवतात.
आज देशाला विकासाची गरज आहे; पण त्याहून अधिक गरज आहे मूल्यांची. देशाला प्रगतीची गरज आहे; पण त्याहून अधिक गरज आहे प्रामाणिक नागरिकांची. आणि प्रामाणिक नागरिक घडतात ते कुटुंबात, आईच्या संस्कारातून, वडिलांच्या त्यागातून आणि समाजाशी जोडणाऱ्या अशा कृतीप्रधान उपक्रमांतून. “बाबा… तुमच्यासाठी!” हा केवळ एक कार्यक्रम नाही; तो कुटुंब संस्थेच्या पुनर्जागरणाचा,संस्कृतीच्या संरक्षणाचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या नव्या अध्यायाची निकड आहे.
जर या उपक्रमाची प्रेरणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि भारताच्या प्रत्येक राज्यात पोहोचली, तर उद्याची पिढी केवळ सुशिक्षित नव्हे, तर सुसंस्कृत, संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रनिष्ठ घडेल.
लेखक -डॉ. शिवदास हमंद,नांदेड.
