
सरसेनापती नेताजी पालकर स्मारकासाठी १ कोटींचा निधी मंजूर
हदगाव /नांदेड| स्वराज्याचे सरसेनापती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या तामसा (ता. हदगाव) येथील समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करून भव्य व उच्च दर्जाचे स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी छावा मराठा संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.



आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले की, त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नेताजी पालकर समाधीस्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून, मा. हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून यापूर्वी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच समाधीस्थळ परिसरातील छोट्या नदीवरील पूल आणि संपर्क रस्त्याचे कामही विकास आराखड्यात समाविष्ट करून मार्गी लावण्यात येणार आहे.



दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या प्राथमिक मागण्या मान्य करण्यात आल्या असून, पालकमंत्र्यांनी डीपीडीसीमधून तात्काळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. या निधीतून स्मारक परिसराचा विकास आराखडा तयार करून आवश्यक विकासकामांना गती देण्यात येणार आहे.



पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांचे प्रतिनिधी किशोर चव्हाण (छावा मराठा संघटना) आणि राजेंद्र दाते पाटील यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून स्मारक व परिसराच्या विकासासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


सरसेनापती नेताजी पालकर यांचा पराक्रम, त्याग आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी, यासाठी भव्य स्मारक उभारणीसह आवश्यक सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. या निर्णयामुळे नेताजी पालकर यांच्या समाधीस्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, शिवभक्त आणि इतिहासप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
