
ग्रामीण जनता अंधारात, महावितरणचे अधिकारी ‘नॉट रिचेबल’!
नांदेड, अनिल मादसवार| ग्रामीण भागातील जनता रात्रीच्या अंधारात आणि महावितरणचे अधिकारी मात्र जनतेच्या फोनपासून दूर, अशी संतप्त परिस्थिती निर्माण झाली आहे. हदगाव–हिमायतनगरसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रात्रीच्या लोडशेडिंगच्या प्रश्नावर आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरणला चांगलेच धारेवर धरले.



वारंवार सूचना देऊनही अधिकारी सुधारत नसतील तर काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करा; अन्यथा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकेन किंवा बैठक इथेच समाप्त करावी, असा थेट इशारा आमदार कोहळीकर यांनी दिला.



ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित केला जात असताना शहरी भागाला तुलनेने वेगळे प्राधान्य का, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शहरी भागात माणसे राहतात आणि ग्रामीण भागात जनावरे राहतात का?” असा संतप्त सवाल त्यांनी बैठकीत केला.


लोडशेडिंग करायचीच असेल तर ती रात्री न करता दिवसा करावी किंवा एक दिवस ग्रामीण भागात आणि एक दिवस शहरी भागात, अशा समान पद्धतीने वीजपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.


वीज जाते, फोनही उचलत नाहीत!
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याची जबाबदारी असलेले लाइनमन, अभियंते आणि संबंधित अधिकारी सामान्य नागरिकांचेच नव्हे, तर लोकप्रतिनिधींचेही फोन उचलत नसल्याच्या प्रकारावर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे फोन उचलले जात नसतील, तर सामान्य नागरिकांची अवस्था काय असेल? असा सवाल करत त्यांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतला.
आता केवळ आश्वासने नकोत, तर ग्रामीण भागातील रात्रीची लोडशेडिंग तात्काळ बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी ठाम भूमिका आमदारांनी घेतली. अन्यथा महावितरणच्या कारभाराविरोधात आणखी तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला.
