
नांदेड,अनिल मादसवार | जिल्ह्यातील विकासकामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग सक्षमीकरण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.



जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ८६७.५९ कोटी रुपयांच्या नियोजनाला मंजुरी देण्यात आली. तसेच सन २०२५-२६ मधील ७९०.५७ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली.



बैठकीत शाळांमधील शौचालये, अतिरिक्त वर्गखोल्या, स्मशानभूमींसाठी जागा उपलब्ध करून देणे आणि इतर मूलभूत सुविधांवरील कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. अपूर्ण विकासकामे लवकर पूर्ण करावीत तसेच शाळांच्या जागांची शासनाच्या नावे नोंदणी करून विकासनिधी आणि सीएसआर निधी मिळविण्यात अडचणी येऊ नयेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.


यंदा कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे नियोजन आतापासूनच करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. तसेच स्मशानभूमींची प्रलंबित कामे पूर्ण करणे, पीक विमा प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यावर भर देण्यात आला.



पोचमपाड धरणाच्या बॅकवॉटर प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली. नांदेड शहरासाठी १५० इलेक्ट्रिक बसांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याच्या सूचनाही महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आल्या. बैठकीत जलसंधारण प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया प्रभावीपणे राबवल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि वीजबिल सवलत निर्णयाचे लोकप्रतिनिधींनी स्वागत केले.
सीसीटीएनएसमध्ये नांदेड राज्यात अव्वल – पोलीस विभागाच्या सीसीटीएनएस (Crime and Criminal Tracking Network & Systems) प्रणालीमध्ये नांदेड जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांनी पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले.

लोकप्रतिनिधींनी मांडले विविध प्रश्न – बैठकीत वीज, पाणीपुरवठा, पीक विमा, रस्ते, आरोग्य, दुबार पेरणी, शाळा, बससेवा, कायदा-सुव्यवस्था, सीसीटीव्ही व्यवस्था, दिव्यांग सुविधा, जलसंधारण, ईव्ही चार्जिंग स्टेशन, वाहतूक कोंडी आणि शहरातील होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिटसह विविध विषयांवर चर्चा झाली. या सर्व विषयांवर पुढील बैठकीपूर्वी संबंधित विभागांनी लेखी अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.
बैठकीत कंधार तालुक्यातील भगवानराव पेठकर यांच्या कुटुंबाचा विवाह सोहळ्यात ३,३६५ नागरिकांचा विमा उतरविण्याच्या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. याच वेळी ‘महाभूसंपादन’ ऑनलाइन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. बैठकीनंतर पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील वीज समस्यांबाबत स्वतंत्र आढावा बैठक घेऊन आवश्यक उपाययोजनांना गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
