
‘जीआय टॅग’; इतिहास, संस्कृती व परंपरेची जपणूक ‘
मंदिरात दररोज महाप्रसादाचे होतेय वाटप…



श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील ‘विडा तांबुल’ या प्रसादाला अखेर बहुमानाचा भौगोलिक मानांकन (‘जीआय टॅग’) मिळाला आहे. केंद्र सरकारच्या चेन्नई येथील ‘जिओग्राफिकल इंडिकेशन्स’ रजिस्ट्रीने याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र प्रसिद्ध केले आहे. भारतात यापूर्वी केवळ तिरुपतीच्या लाडूला प्रसादाच्या स्वरूपात ‘जीआय टॅग’ मिळाला होता. त्यानंतर हा बहुमान मिळवणारा माहूरचा तांबुल हा देशातील दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रसाद ठरला आहे.
माहूरगड श्री रेणुका मातेचा पानाच विडा तांबुल हा मुख्यप्रसाद आहे. पुरणपोळी नैवेद्यानंतर तांबुल विड्याचा वापर करतात.



ज्या ठिकाणी देवीची मंदिरे आहेत तेथे विशेष करून विडा तांबुल नैवेद्य देवीला अर्पण करण्याची परंपरा आहे. हा ऐतिहासिक बहुमान मिळवून देण्यासाठी भौगोलिक मानांकनतज्ज्ञ डॉ. गणेश हिंगमिरे यांनी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली. आज रोजी माहूर गडावर अमोल गावंडे, पांडुरंग राठोड, विशाल चौधरी, संतोष परळकर, अनिल परळकर, अभिषेक परळकर आणि लवकुश जाधव ही ७ कुटुंबे देवीच्या सेवेत सातत्याने हा तांबुल प्रसाद तयार करत आहेत. या प्रक्रियेत रेणुकादेवी मंदिराचे विश्वस्त तथा मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी आणि समीर भोपी यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले. यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.



“” तांबुलाची आहे रजक कथा”‘ ‘आई रेणुका मातेने श्री विष्णुकवी महाराज यांच्या स्वप्नात येऊन तांबुलाचा नैवेद्य तयार करण्याची आज्ञा दिली होती. तेव्हापासून ही परंपरा अखंड सुरू आहे,’ अशी माहिती तांबुल तयार करणारे अमोल गावंडे यांनी दिली. मंदिरात दररोज सकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत हा प्रसाद तयार करण्याचे काम अविरत सुरू असते.


” चौदा प्रकारच्या साहित्यांचा समावेश” या तांबुलामध्ये नागवेलीची पाने, कात, चुना, सोप, सुपारी, लवंग, विलायची, जयफळ, जायपत्री, ओवा, धनीयादाळ, आस्मान तारा, ज्येष्ठमध, चमनबार यांचा समावेश असतो. यासर्व वस्तू एकत्र करून खलबत्यात कुटल्या जातात. हे सर्व साहित्य अन्नपचनासाठी उपयुक्त असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.
३ वर्षांच्या पाठपुराव्याला यश ! ‘जीआय मानांकन मिळवण्यासाठी ऐतिहासिक संदर्भ, पुरावे, संस्कृती, परंपरा आणि तांबुलाचे औषधी गुणधर्म या सर्व बाबी सिद्ध कराव्या लागतात. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. या मानांकनामुळे आता ‘माहूरचा तांबुल’ या नावाने इतर कुठेही बनावट विक्री करता येणार नाही. यामुळे भाविकांची फसवणूक थांबेल आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.– प्रा. डॉ. गणेश हिंगमिरे, भौगोलिक मानांकनतज्ज्ञ
