
बालभारतीच्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता तिसरीच्या पुस्तकात ‘Struggler Bhagyashree Jadhav’ धडा
नांदेड| नांदेड जिल्ह्याची भूमिकन्या आणि महाराष्ट्र भूषण आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची दखल आता राज्याच्या शालेय अभ्यासक्रमाने घेतली आहे. त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित धडा यावर्षीपासून बालभारतीच्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.



मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री जाधव यांनी अवघ्या अकरा वर्षांच्या क्रीडा प्रवासात गोळाफेक आणि भालाफेक या क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पॅरा ऑलिम्पिक आणि वर्ल्ड पॅरा चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यांनी दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.



नुकत्याच झालेल्या वर्ल्ड पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची ध्वजवाहक होण्याचा बहुमानही त्यांना मिळाला.
त्यांच्या क्रीडा कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले असून, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदावरही त्यांची नियुक्ती केली आहे.


बालभारतीच्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील पान क्रमांक ३९ वरील युनिट-२ मध्ये ‘Struggler Bhagyashree Jadhav’ या शीर्षकाखाली त्यांच्या संघर्षमय जीवनाची आणि यशोगाथेची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी या धड्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश करण्यात आला आहे.


विशेष म्हणजे, भाग्यश्री जाधव यांच्या जीवनाला सकारात्मक दिशा देण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे त्यांचे प्रेरणास्थान ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या सहकार्याची नोंदही या धड्यात करण्यात आली आहे.
शालेय अभ्यासक्रमात जीवनप्रवास समाविष्ट होणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील त्या पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत. त्यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी आता राज्यातील हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या धड्याच्या समावेशाबद्दल भाग्यश्री जाधव यांनी बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक, इंग्रजी अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष संजय पवार, सदस्य शिवाजी कराळे यांच्यासह सर्व सदस्यांचे आभार मानले आहेत. भाग्यश्री जाधव यांच्या या अभिमानास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
