नेताजी पालकर समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासाठी सकल मराठा समाजाचा पाठिंबा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणाला वाढता प्रतिसाद; प्रशासनाकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
नांदेड | स्वराज्याचे सरसेनापती छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे नेताजी पालकर यांच्या तामसा (ता. हदगाव) येथील समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करून उच्च दर्जाचे स्मारक उभारावे, या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला सकल मराठा समाज, नांदेड जिल्ह्याने जाहीर पाठिंबा दिला.

छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण आणि मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र दाते पाटील हे १६ जुलैपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांच्या मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. तसेच १७ जुलै रोजी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुल सावे आणि जिल्हा प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करून मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली.

आंदोलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि सकल मराठा समाजाचा पाठिंबा लक्षात घेता प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत सर्व मागण्यांची पूर्तता लवकरच करण्याचे आश्वासन दिले. तसेच उपोषण सोडण्याची विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयक सुचिता जोगदंड-वडजे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब कल्याणकर, सोपानराव शिरसागर, इंजि. तानाजी हुस्सेकर, छावा संघटनेचे दशरथ कपाटे, सुनील कदम, मराठा सेवक संभाजी भोसले, सुधीर देशमुख, महाबली छत्रपती शहाजी राजे ट्रस्टचे बाजीप्रताप मोरे, विशाल इंगळे, गोविंद कदम, गणेश कपाटे यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते.

नेताजी पालकर यांच्या समाधीस्थळाच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या या लढ्याला महाराष्ट्रातील शिवभक्तांचा वाढता पाठिंबा मिळत असून, प्रशासनाच्या आश्वासनानंतर पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!