
नांदेड| हालाकीच्या परिस्थितीत शिक्षणाचे अज्ञान असलेल्या शेतकरी कुटुंबात कवी गोविंद कवळे यांचा जन्म झाला. कमी वयातच वडिलांचे छत्र हरवले आणि सोबत बहिणीची माया ही हरवली. कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे सुरू झाले तर दुसरीकडे शिक्षणाचा प्रवास थांबला पण बालपणापासूनच त्यांच्या मनात झालेल्या परिस्थितीचा परिणाम त्यांना चिंतन करायला भाग पाडत गेला.



चिंतन करताना अंधाऱ्या रात्री मनात त्यांच्या शब्दांची जुळवाजुळव नकळतच होऊ लागली आणि हळूहळू हा रोजचाच नित्यक्रम झाला. यात परिस्थितीची चिंतन करत असताना एका कवीचा जन्म झाला. आयुष्यात आलेल्या चढउतारात फुंकर घालणारी व्यक्ती असल्यास माणसाच्या जीवनात अजून संघर्ष करण्यास बळ मिळतं, याचे महत्त्व सांगणारा फुंकर कवितासंग्रह . पुस्तकाचं शीर्षक असलेल्या पहिल्याच कवितेत ज्यात कवी दुःख,संघर्ष, झळा,अवघड वाटा, अनवाणी पायाला टोचणारे काटे सगळं सहन करतो फक्त त्याच्या मनावर नवी आशा, नवी जिद्द निर्माण करण्यासाठी कोणीतरी फक्त या काळात फुंकर घालावी ही माफक अपेक्षा धरताना, कुणाकुणाचे घेऊ दुःख मलाच सापडेना माझे सुख..पुढे ‘येईल दिवस उद्याचा’ ही कविता अतिशय भावास्पर्शी. प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या भावना या ठिकाणी कवीने कागदावर उतरवल्या आहेत. ‘करतो तुम्हास मुजरा’ स्वराज्य जननी माँसाहेब जिजाऊ यांना अतिशय कृतज्ञतापूर्वक सादर केलेली शब्दांची माळ आहे.



यासह पुढे शंभुराजे यांना ‘शूर आबांचा शूर छावा’, मराठवाडा मुक्ती संग्रामातील वीरांना ‘वीरांची बाजी’, संत तुकोबा, छत्रपती शिवराय, गाडगेबाबा,अण्णाभाऊ साठे, बाबासाहेबांच्या विचारांना वंदन करणारी ‘वंदन महापुरुषांना’ व संविधानाने दिलेल्या सन्मानाबद्दल डॉ. आंबेडकरांचे आभार व्यक्त करणारी ‘वंदन तुम्हास’, सावित्रीमाईच्या धाडसाला कृतज्ञता व्यक्त करणारी ‘वंदन कार्याला, सांग ना रायगडा’ शौर्यशाली इतिहासाची साक्ष देणारा स्वराज्याची राजधानी असणाऱ्या इतिहासातील ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या श्रीमंत रायगडाला घातलेली साद मनात घर करते.


स्वार्थी जगात लोप पावत चाललेल्या माणुसकीला जिवंत ठेवण्यासाठी तरसणाऱ्यांना, गरजूंना वंचितांना, दुबळ्यांना, अपघातग्रस्तांना, वेदनाग्रस्तांना ‘देत चला हो माणुसकी’ अशा शब्दात माणूसकी दाखवण्याची अपेक्षा कवी व्यक्त करतो. ‘शेतकरी उभा बांधावर, शिवार फुलला, करतो विनंती तुला, ये लवकरी,अश्रूंचे पाट वाहत होते, कष्ट करणारा बाप या कविताने तर शेतकऱ्यांचे हालाखीचे जीवन त्यांची होणारी फरपट, संघर्षात सुद्धा मनात अशेचा किरण ठेवणारा आशावादी कष्टकरी शेतकऱ्याच्या आयुष्याची वाताहात शब्दांच्या रूपाने मनाला भिडून अश्रूंना डोळ्यातून वाट मोकळी करण्यास भाग पाडणारी आहे.किती जरी खचला तरी एखाद्याने मनावर घातलेली ‘फुंकर’ त्यांच्यासाठी एक नवी संजीवनी ठरते.


सांग मी काय करावे, तुझा रुसवा, लग्नाचा वाढदिवस, उजाळा, प्रीतीचा गंध, मैत्री, तुझी साथ, आधार झालीस तू, कोण होतीस तू, घराला घरपण देणारी, प्रीतीचा गंध, तुझी साथ या अशा कविता प्रेम, प्रेमावरचा अढळ विश्वास व कठीण काळात एकमेकांच्या दुःखावर घातलेली ‘फुंकर’ व प्रेमाचे विविध भाव कवी गोविंद कवळे यांनी शब्दबद्ध केले आहेत. कवितासंग्रहात एकूण ५२ कविता असून विविध विषयाच्या भावाला स्पर्श करणाऱ्या कवितेतून कवी सुंदर रित्या व्यक्त झाले आहेत. अनेक विषयाला हात घालत व्यक्तीला आयुष्यात येणाऱ्या संघर्षातून उभारी देण्यासाठी कोणीतरी ‘फुंकर’ घालायची फक्त अपेक्षा करतो. ती भेटली की माणूस पुन्हा नव्या उमेदीने आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज होतो.

या कविता संग्रहाच्या माध्यमातून ‘फुंकर’ ची किंमत व महत्त्व याची या ठिकाणी प्रकर्षाने जाणीव होते. कवितासंग्रहाला उद्देशून संतोष घोंगडे यांनी अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ चित्रित केले आहे. त्यासोबतच दिगंबर कदम सरांची प्रस्तावना व देविदास फुलारी सरांची पाठ राखण अतिशय सुंदर आहे . या कवितासंग्रहाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात आलेल्या या नवोदित कवी गोविंद कवळे यांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील लेखन प्रवासास हार्दिक शुभेच्छा!
फुंकर: ( कवितासंग्रह )
कवी: गोविंद कवळे
प्रकाशन: गणगोत प्रकाशन
मुखपृष्ठ: संतोष घोंगडे
पाने 64, मूल्य 140
