
शेतकरी पुत्रांचे तहसीलदारांना निवेदन; भारनियमन कमी करण्याचीही मागणी
मुखेड/नांदेड, प्रतिनिधी| मुखेड तालुक्यात पावसाने घेतलेल्या दीर्घ खंडामुळे पिके करपली असून, अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने शेती काळी पडली आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी पुत्रांनी तहसीलदार शंकर लाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.



निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक ठिकाणी पिके करपली असून, काही भागात बियाणे उगवलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पिकांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.



चाऱ्याचा प्रश्न गंभीर
शेतकऱ्यांकडे साधारणपणे जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढ्याच चाऱ्याचे नियोजन असते. मात्र, जुलैअखेरपर्यंतही पावसाचा खंड कायम राहिल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


यासोबतच शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, विनाअट पीककर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आणि महावितरणचे भारनियमन कमी करून शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करावा, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.



यावेळी बालाजी पाटील ढोसणे, गिरीधर पाटील केरुरकर, शिवशंकर पाटील कलबरकर, रमाकांत पाटील जाहूरकर, निळकंठ पाटील कोळनुरकर, निशिकांत पाटील इंगळे, किशोर देशमुख, प्रशांत देशमुख, नारायण देशमुख, अंकुश हावरगे मावलीकर यांच्यासह शेतकरी पुत्र उपस्थित होते.
