
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराज : विचारधारा आणि व्यवस्थापन’ या विषयात एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी लक्ष्यवेध फाऊंडेशनच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन लक्ष्यवेध फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल मोरे आणि उपाध्यक्ष तथा निवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना दिले.



छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, राष्ट्रनीती, लोककल्याणकारी प्रशासन, नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन तत्त्वांचा शैक्षणिक पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा, या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचे विचार आजही प्रशासन, न्यायव्यवस्था, राष्ट्रनिष्ठा, लोककल्याण आणि दूरदृष्टीच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी आहेत.



त्यांच्या कार्याचा शैक्षणिक अभ्यास विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, व्यवस्थापन कौशल्य, निर्णयक्षमता, शिस्त, नैतिक मूल्ये, संघटन कौशल्य आणि संकट व्यवस्थापनाची क्षमता विकसित करण्यास उपयुक्त ठरेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत भारतीय ज्ञानपरंपरा, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि भारतीय इतिहासाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांना पूरक ठरणारा असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.


आजच्या काळात युवकांना व्यसनमुक्त, चारित्र्यसंपन्न, कर्तव्यदक्ष, समाजाभिमुख आणि सक्षम नेतृत्व म्हणून घडविण्यासाठी शिवचरित्राचा शैक्षणिक अभ्यास आवश्यक असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘छत्रपती शिवाजी महाराज : विचारधारा आणि व्यवस्थापन’ हा अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू असून विद्यार्थ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातही हा अभ्यासक्रम सुरू केल्यास मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैचारिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने या अभ्यासक्रमास मान्यता देऊन तो लवकरात लवकर सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
