
१२ जागांसाठी निवडणुकीची रंगत; प्रमुख मतदारसंघांत दुरंगी लढती
नांदेड | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २३ पैकी ११ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, उर्वरित जागांसाठी निवडणुकीची रंगत वाढली आहे. विविध मतदारसंघांमध्ये उमेदवार आमनेसामने आल्याने सहकार क्षेत्रातील या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये कंधार मतदारसंघातून प्रणिता देवरे चिखलीकर, लोहा मतदारसंघातून आमदार प्रताप पाटील चिखलीकर, नायगावमधून श्रीनिवास चव्हाण, मुखेडमधून आमदार तुषार राठोड, किनवटमधून आमदार भीमराव केराम, उमरीमधून मारोतराव कवळे आणि बिलोलीमधून मीनल पाटील खतगावकर यांचा समावेश आहे.



महिला प्रवर्गातून सुशिलाताई हणमंतराव बेटमोगरेकर आणि पूनम राजेश पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच ‘ब’ प्रवर्गातून शिवराम लूटे आणि ‘क’ प्रवर्गातून कैलास देशमुख गोरठेकर यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.


दरम्यान, विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गात ज्ञानेश्वर दहिफळे आणि उकंडराव जाधव, तर ओबीसी प्रवर्गात अनिल पाटील बाभळीकर आणि ज्ञानेश्वर राजेगोरे यांच्यात लढत होणार आहे. एससी-एसटी प्रवर्गात रामचंद्र मुसळे, विजय सोनवणे आणि प्रतिभा एर्डावार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


मतदारसंघनिहाय निवडणुकीत हदगावमध्ये चंद्रशेखर कदम आणि कृष्णा पाटील आष्टीकर, हिमायतनगरमध्ये माधवराव पाटील जवळगावकर आणि विशाल राठोड, देगलूरमध्ये विजयसिंह देशमुख आणि स्वेता पाटील, तर धर्माबादमध्ये दत्तात्रय रेड्डी आणि गोविंद जाधव यांच्यात लढत होणार आहे.
नांदेड मतदारसंघात अतुल वाघ आणि संगिता पाटील डक, भोकरमध्ये राजू जाधव आणि माधव कदम, माहूरमध्ये राजेंद्र केशवे आणि ज्योतीबा खराटे, मुदखेडमध्ये मारोती जाधव आणि मारोतराव पाटील, तसेच अर्धापूरमध्ये बालाजी कदम आणि ज्ञानेश्वर राजेगोरे यांच्यात निवडणूक रंगणार आहे.
बिनविरोध निवडीमुळे काही जागांवरील निवडणूक टळली असली तरी उर्वरित मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तासमीकरणासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.
