
हिमायतनगर तालुक्यात वृक्षलागवडीच्या नावाखाली शासनाच्या निधीची उधळपट्टी?
लावलेली ५० टक्के रोपे वाळली; शेकडो रोपे उघड्यावर फेकली..!
सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..!



हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, याच काळात सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या वृक्षलागवडीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. सवना, सिरंजणी, पळसपूर आणि हिमायतनगर परिसरात लावण्यात आलेल्या रोपांपैकी तब्बल ५० टक्के रोपे पाण्याअभावी वाळून गेल्याचा गंभीर आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केला आहे.



रोपे लावली, फोटो काढले आणि जबाबदारी संपली का? वृक्षलागवड झाल्यानंतर रोपांना पाणी देणे, संरक्षण करणे आणि त्यांचे संगोपन करणे ही विभागाची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात रोपे लावून त्यांची देखभाल करण्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शेकडो रोपे उघड्यावर फेकून दिल्याचे ढिगारे दिसत आहेत. त्यामुळे ही वृक्षलागवड नेमकी पर्यावरणासाठी झाली की शासनाचा निधी खर्च दाखविण्यासाठी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.


उन्हाळ्यात वृक्षलागवड करून ‘फोटोसेशन’; रोपांना पाण्याचा थेंबही नाही! कडक उन्हाळ्यात वृक्षलागवड करण्यात आली. पाऊस नसताना आणि पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसताना रोपे लावण्यात आली. परिणामी, मोठ्या प्रमाणात रोपे वाळून गेली. वृक्षलागवडीच्या नावाखाली केवळ खड्डे खोदणे, रोपे लावणे आणि कागदोपत्री अहवाल तयार करणे एवढेच काम झाले का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.


सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी ‘उंटावरून शेळ्या हाकत’ आहेत का? हिमायतनगर तालुक्यातील वृक्षलागवडीची प्रत्यक्ष पाहणी अधिकारी करतात की नाही, हा गंभीर प्रश्न आहे. संबंधित अधिकारी कार्यालयात बसून कागदोपत्री अहवाल तयार करतात आणि प्रत्यक्ष ठिकाणी रोपांची काय अवस्था आहे, याकडे डोळेझाक करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. काही कामे खासगी व्यक्तींकडे सोपवून शासनाच्या निधीचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही पर्यावरणप्रेमींनी केला आहे. त्यामुळे वृक्षलागवडीच्या नावाखाली निधी लाटण्याचा प्रकार सुरू आहे का, याची चौकशी होणे अत्यावश्यक आहे.

वृक्षतोड थांबत नाही; वृक्षलागवड जगत नाही! एकीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. दुसरीकडे शासनाच्या निधीतून लावलेली रोपे जगविण्यात सामाजिक वनीकरण विभाग अपयशी ठरत आहे. परिणामी, पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, वाढत्या उष्णतेचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
वृक्षलागवडीसाठी शासन निधी उपलब्ध करून देत असताना तो निधी नेमका कुठे खर्च झाला? किती रोपे लावण्यात आली? त्यापैकी किती जिवंत आहेत? किती रोपे वाळली? रोपांच्या संगोपनासाठी किती खर्च करण्यात आला? या सर्व प्रश्नांची उत्तरे सामाजिक वनीकरण विभागाने जनतेसमोर द्यावीत.
चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा? हिमायतनगर तालुक्यातील वृक्षलागवडीची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा. शासन निधीचा अपव्यय झाला असल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.
‘वृक्षलागवड’च्या नावाखाली रोपे लावायची, फोटो काढायचे, निधी खर्च दाखवायचा आणि नंतर रोपे वाळली तरी जबाबदारी झटकायची—हा कारभार आता चालणार नाही. शासनाचा पैसा जनतेचा आहे; त्याचा हिशेब जनतेला द्यावाच लागेल! अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत, याबाबत श्री पाटील नामक सामाजिक वनिकरण अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला तर त्यांनी फोन उचलला नाही.
