एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : आधुनिक शेतीसाठी अनुदानाची सुवर्णसंधी; महाडीबीटीवर अर्ज सुरू

नांदेड| एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी नांदेड जिल्ह्यास रु. २६८.३६ लाखांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला आहे. फळबाग लागवड, रोपवाटिका, हरीतगृह, शेडनेट, शेततळे, कांदाचाळ, अळिंबी उत्पादन, मधुमक्षिकापालन, कृषी यांत्रिकीकरण, शीतगृह, पॅक हाऊस आदी विविध घटकांसाठी आकर्षक अनुदान उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार राधाकृष्ण कळसाईत यांनी केले आहे.

या अभियानाचा उद्देश आधुनिक, शाश्वत आणि कमी खर्चातील शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रातील लहान व मोठ्या रोपवाटिका, विविध फळपिकांची लागवड, अळिंबी व बीज उत्पादन केंद्र, कंपोस्ट युनिट, सुगंधी व औषधी वनस्पती, फुलशेती, मसाला पिके, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक व वैयक्तिक शेततळे, हरीतगृह, शेडनेट, प्लास्टिक मल्चिंग, तण नियंत्रक अच्छादन, मधुमक्षिकापालन तसेच ट्रॅक्टर, पॉवर टिलर, विविध स्प्रेअर्स, फार्म गेट पॅक हाऊस, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र आणि कमी खर्चाच्या कांदाचाळ किंवा लसूण साठवणूक गृहासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत. अर्जांची निवड “प्रथम अर्ज – प्रथम लाभ” या तत्त्वावर करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी जातीचे प्रमाणपत्र आणि फार्मर आयडी आवश्यक आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी (मोका तपासणी) झाल्यावर पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाईल. यापूर्वी संबंधित घटकांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार राधाकृष्ण कळसाईत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!