
हदगाव/हिमायतनगर/नांदेड, अनिल मादसवार| पावसाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असताना, हदगाव-हिमायतनगर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेली रात्रीची लोडशेडिंग तात्काळ बंद करावी, अशी ठाम मागणी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महावितरणच्या मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांकडे केली आहे.



पावसाळ्यात साप, विंचू तसेच इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढतो. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित असल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे आमदार कोहळीकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.



महावितरणचे ग्राहक ग्रामीण असोत किंवा शहरी—सर्वांकडून वीजबिल आकारले जाते. मग अखंडित वीजपुरवठा केवळ शहराला आणि रात्रीची लोडशेडिंग ग्रामीण भागाला का? असा सवाल उपस्थित करत ग्रामीण जनतेवर होणारा हा अन्याय तात्काळ थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



लोडशेडिंग अपरिहार्य असल्यास ती रात्रीऐवजी दिवसा करण्यात यावी. तसेच आवश्यक असल्यास ग्रामीण आणि शहरी भागात समान व न्याय्य पद्धतीने वीजपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी सूचनाही आमदारांनी केली आहे.


दरम्यान, ग्रामीण भागातील रात्रीची लोडशेडिंग तात्काळ बंद न केल्यास नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. “ग्रामीण जनतेलाही सुरक्षित आणि अखंडित वीजपुरवठ्याचा समान हक्क आहे,” असा स्पष्ट संदेश आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
