
SIR कॅम्पला हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नाव व माहिती दुरुस्तीला प्राधान्य



तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष रफिक सेठ यांच्या पुढाकारातून कॅम्पची सुरुवात



हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| नेहमी गजबजणाऱ्या हिमायतनगरच्या चौपाटीवर गुरुवारी राजकीय सभा किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हता, तर आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेष मतदार पडताळणी (SIR) कॅम्पमुळे चौपाटी परिसराला अक्षरशः ‘मतदार पडताळणी केंद्रा’चे स्वरूप आले होते.


लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कॅम्पमध्ये हजारो महिला-पुरुष मतदारांनी सहभाग घेतला. नाव, पत्ता आणि मतदार यादीतील इतर माहिती तपासण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.


विशेषतः २००२ च्या मतदार यादीत नाव असलेल्या नातेवाईकांचा पुरावा सादर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. अनेक नागरिकांनी आपल्या मतदार नोंदीतील चुका दुरुस्त करून घेतल्या, तर काहींनी नाव नोंदणीसाठी आवश्यक माहिती व कागदपत्रांची पूर्तता केली.

तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत कॅम्पची सुरुवात झाली. यावेळी उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार, माजी नगराध्यक्ष अखिल भाई, शहरातील नगरसेवक, BLO, अंगणवाडी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

“मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मतदार यादीत आपले नाव असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने आपली नोंद तपासावी,” प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांनी केले.
दरम्यान, चौपाटीवर एकाच वेळी हजारो नागरिक मतदार यादीची पडताळणी करताना दिसल्याने ‘चौपाटीवर यावेळी फिरायला नव्हे, तर मतदार यादी तपासायला गर्दी’ अशी चर्चा शहरात रंगली होती.
