
नांदेड | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड आगारात मंगळवारी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, प्रवासी आणि प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांनी वृक्ष लागवडीसोबतच त्यांच्या संगोपनाचे महत्त्व अधोरेखित केले. “वृक्षारोपण ही काळाची गरज असली तरी वृक्षांचे संगोपन होऊन त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची वेळ आली, तरच या उपक्रमाला खऱ्या अर्थाने यश मिळेल,” असे त्यांनी सांगितले.



ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवदास हमंद यांनीही पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाला परिवहन अधिकारी चिन्मय चिटणीस, आगारप्रमुख दिग्विजय नरंगले, बस स्थानक प्रमुख यासीन खान तसेच प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


आगारप्रमुख दिग्विजय नरंगले आणि बस स्थानक प्रमुख यासीन खान यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात प्रारंभी डॉ. शिवदास हमंद आणि गोविंद मुंडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर शंकरराव नांदेडकर यांच्या हस्तेही वृक्ष लागवड करण्यात आली.


या प्रसंगी परिवहन अधिकारी चिन्मय चिटणीस यांच्यासह चालक, वाहक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करून पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी आगारप्रमुख दिग्विजय नरंगले यांनी नांदेड आगार परिसरात पहिल्या टप्प्यात १०० वृक्षांची लागवड करण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच आगामी काळात आणखी १४० वृक्षांची लागवड करून नांदेड आगार अधिक हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे विशेष आकर्षण ठरला असून उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
