
नांदेड | समाजप्रबोधन, साहित्यसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक तथा प्रसिद्ध चिकित्सक डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांचा चळवळी योद्धे स्व. बसवंतराव मुंडकर विचार मंच, नांदेड यांच्या वतीने बुधवारी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.



डॉ. जोशी पाटोदेकर लिखित ‘हे बंध समाजनिष्ठेचे’ या समाजप्रबोधनपर ग्रंथाला प्रतिष्ठेचा प्रसाद प्रतिष्ठान ग्रंथ गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. अलीकडेच नांदेड येथे झालेल्या विशेष समारंभात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.



यावेळी उपस्थितांनी सांगितले की, डॉ. जोशी पाटोदेकर यांनी वैद्यकीय व्यवसायाला केवळ उपजीविकेचे साधन न मानता समाजसेवेचे प्रभावी माध्यम बनविले. त्याचबरोबर आपल्या साहित्यलेखनातून त्यांनी सामाजिक बांधिलकी, मानवी मूल्ये, लोकजागृती आणि समाजनिष्ठ विचारांचा सातत्याने पुरस्कार केला आहे.


‘हे बंध समाजनिष्ठेचे’ हा ग्रंथ समाजजीवनातील नातेसंबंध, सामाजिक उत्तरदायित्व आणि संवेदनशीलतेचा वेध घेणारा असून वाचकांमध्ये सामाजिक जाणीव दृढ करणारा ठरला आहे. त्यामुळे या ग्रंथाला प्राप्त झालेला प्रसाद प्रतिष्ठान ग्रंथ गौरव पुरस्कार हा त्यांच्या प्रदीर्घ साहित्यसेवेचा आणि समाजाभिमुख चिंतनाचा योग्य सन्मान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


चळवळी योद्धे स्व. बसवंतराव मुंडकर विचार मंचाच्या वतीने करण्यात आलेला हा सत्कार समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. समाजमनाला दिशा देणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करणे ही प्रेरणादायी परंपरा असून, अशा व्यक्तिमत्त्वांमुळे नव्या पिढीला विचार, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्वाची प्रेरणा मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या सत्कार समारंभाला डॉ. शिवदास हमंद आणि ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थितांनी डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्यनिर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या.
