132 केव्ही उपकेंद्र असतानाही खानापूरमध्ये लोडशेडिंग; नागरिकांचा संताप

खानापूर/देगलूर/नांदेड, माणिक रायकोडे | राज्यात विजेची कमतरता नसल्याचा दावा शासनाकडून केला जात असताना खानापूर येथे अचानक साडेतीन तासांच्या लोडशेडिंगला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “वीज उशाला, कोरड कशाला?” असा सवाल उपस्थित करत खानापूरकरांनी वीज वितरण कंपनीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.

खानापूर येथे १३२ केव्ही उपकेंद्र उभारण्यात आले असूनही स्थानिकांना अंधारात राहावे लागत आहे. दुसरीकडे शेजारील एमआयडीसी परिसराला अखंड वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांनी दुहेरी निकषांचा आरोप केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, १३२ केव्ही उपकेंद्रासाठी गावातील गायरान व शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्या वेळी खानापूरमध्ये भविष्यात वीजटंचाई भासणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात लोडशेडिंग सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

यापार्श्वभूमीवर खानापूर ग्रामपंचायतीने उपकेंद्र उभारण्यात आलेल्या जागेवर कर आकारणी करण्याचा ठराव मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या करातून मिळणाऱ्या निधीचा वापर गावाच्या गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करून २४ तास वीजपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच नागरिकांनाही दिलासा मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीने याबाबतचा ठराव शासनाकडे पाठवून नगरविकास विभाग व ऊर्जा मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा, तसेच लोकसहभागातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा विचार करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, खानापूर येथे १३२ केव्ही उपकेंद्र मंजूर व्हावे यासाठी तत्कालीन भाजप तालुकाध्यक्ष माणिकराव रायकोडे व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन ऊर्जामंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या वेळी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी खानापूरला भविष्यात वीजटंचाई भासणार नसल्याचे आश्वासन दिल्याची आठवणही नागरिकांनी करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!