
नांदेड | पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू सेवनामुळे झालेल्या २४ जणांच्या मृत्यू प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करावी, या मागण्यांसाठी सीटू कामगार संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ जुलैपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.



संघटनेने दिलेल्या निवेदनात, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांना जबाबदार धरून त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नांदेड विभागीय उपायुक्त बाबू हमीद तडवी यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केलेले ताडी दुकान बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याचा, पदाचा गैरवापर केल्याचा आणि विविध गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विभागीय, खातेनिहाय तसेच मालमत्तेची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.



या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री सुनेत्राताई पवार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे, राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.


संघटनेचे म्हणणे आहे की, विषारी दारू प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश मजूर व मागासवर्गीय नागरिकांचा समावेश असून त्यांना न्याय मिळावा आणि मोठ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले असून, जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही आणि पीडितांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.


या आंदोलनाचे नेतृत्व सीटूच्या राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार, जिल्हा सरचिटणीस कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. राहुल नरवाडे, कॉ. अब्दुल वसीम, कॉ. सं. ना. राठोड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ. पंढरी बरुडे आणि कॉ. सोनाजी कांबळे आदी करत आहेत. तसेच सीटू राज्य समिती सदस्य कॉ. करवंदा गायकवाड आणि जमसंच्या राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. लता गायकवाड यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
याशिवाय, माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद येथे सुरू असलेल्या दारूबंदी आंदोलनालाही संघटनेने पाठिंबा जाहीर केला असून जिल्हास्तरावर या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
