
लोहा | लोहा शहरावर ओढवलेले भीषण पाणी संकट अखेर टळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लिंबोटी धरणातून सुनेगाव तलावात एक दलघमी पाणी सोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे.



नगराध्यक्ष शरद पवार व त्यांच्या टीमने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर नगर परिषदेने अधिकृत प्रस्ताव सादर केल्यानंतर बुधवारी (15 जुलै) पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले.



लोहा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुनेगाव तलावातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर होता. एप्रिल महिन्यात लिंबोटी धरणातून दीड दलघमी पाणी सोडण्यात आले होते. मात्र अकरा गावांच्या पाणीपुरवठा योजनेसह अन्य कारणांमुळे पाण्याचा साठा झपाट्याने कमी झाला. यावर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली होती.


शहरातील वाढते पाणी संकट लक्षात घेऊन नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करिम शेख व सहकाऱ्यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला एक दलघमी पाणी सोडण्याचे आदेश दिले. २०१९ मध्ये अशाच परिस्थितीत शहराला गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्यावेळी नगर परिषदेला टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी मोठा खर्च करावा लागला होता. यावेळी वेळेत उपाययोजना झाल्यामुळे शहरावरील संभाव्य संकट टळल्याचे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


पाण्यासाठी पोलीस बंदोबस्त – लिंबोटी धरणातून नदीपात्राद्वारे सुनेगाव तलावात पाणी सोडण्यात येणार असून पाणी सुरक्षितपणे तलावापर्यंत पोहोचावे यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी संपूर्ण मार्गावर देखरेख ठेवणार आहेत. आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
