नाविन्यपूर्ण उपक्रमांतून जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी जनजागृती करा : विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर| अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून व्यापक जनजागृती करावी. तसेच समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्या.

जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गठित विभागीय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, समाज कल्याण विभागासह संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत विभागीय आयुक्तांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, जनजागृती उपक्रम आणि उपलब्ध निधीच्या वापराचा विभागनिहाय आढावा घेतला. जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका नियमित घेऊन त्यातील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. दाखल प्रकरणांचा वेळेत निपटारा करणे, पीडितांना तातडीने आर्थिक मदत, पुनर्वसन आणि शासनाच्या विविध सवलतींचा लाभ वेळेत मिळावा यासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

तसेच तृतीयपंथीय हक्क संरक्षण व कल्याण मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना तृतीयपंथीय व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने सोडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत विभागातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यान्वित असलेल्या तसेच विविध कारणांमुळे बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या स्थितीचाही आढावा घेण्यात आला. बंद कॅमेरे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावेत आणि प्रस्तावित सीसीटीव्ही यंत्रणेची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्या. बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!