
घातपात की अपघात? शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष
हदगाव, गौतम वाठोरे |हदगाव तालुक्यातील नेवरी येथील बेपत्ता युवक प्रशांत देवराव इंगळे (वय ३८) यांचा मृतदेह रविवारी (दि. १२) आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हदगाव–वांरगा मार्गावरील वांरगा फाट्याजवळ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, त्यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की घातपातामुळे, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.



प्रशांत इंगळे हे शेतीसोबतच शेतीमालाच्या खाजगी व्यापाराचा व्यवसाय करत होते. दि. ९ जुलै रोजी ते कोळी (ता. हदगाव) येथे नातेवाईकांच्या विवाहसमारंभासाठी गेले होते. समारंभानंतर ते दुचाकीने नांदेड येथील राहत्या घरी जाण्यासाठी निघाले होते. मात्र, सायंकाळपर्यंत ते घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने हदगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.



दरम्यान, दि. १२ जुलै रोजी दुपारच्या सुमारास वांरगा फाट्याजवळ एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ओळख पटवल्यानंतर मृतदेह प्रशांत इंगळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.


प्रशांत इंगळे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले असून, सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.


या घटनेमुळे नेवरीसह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून, पुढील तपास आखाडा बाळापूर पोलीस करीत आहेत.
