कामारी जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा लेट-लतिफ कारभार; संतप्त पालकांचा घेराव

शाळेच्या वेळेनंतरही विद्यार्थी गेटबाहेर; जबाबदार शिक्षकांवर कारवाईची मागणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या कथित उशिरा हजेरीमुळे सोमवारी (दि. १४ जुलै) पालक आणि ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. शाळा सुरू होण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही काही शिक्षक वेळेवर शाळेत न पोहोचल्याने संतप्त पालकांनी संबंधित शिक्षकांना शाळेच्या प्रवेशद्वारावर घेराव घालत जाब विचारला.

सकाळी शाळेची वेळ होऊनही अनेक विद्यार्थी शिक्षकांची प्रतीक्षा करत शाळेच्या गेटबाहेर उभे असल्याचे चित्र पाहून पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी असा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

शासन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना काही शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे शासनाच्या उद्दिष्टांनाच हरताळ फासला जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

कामारी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ३०५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, १५ शिक्षकांची नियुक्ती असल्याची माहिती आहे. एवढी शिक्षकसंख्या उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांना वेळेवर अध्यापन मिळत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

या प्रकरणाची तोंडी तक्रार गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, संबंधित शिक्षकांच्या उशिरा हजेरीची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे.

आता गटशिक्षण अधिकारी व गटसाधन केंद्र या प्रकरणाची किती गंभीर दखल घेतात आणि संबंधित शिक्षकांवर काय कारवाई करतात, याकडे कामारीसह परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!