वाघीत व्यसनमुक्तीकडे सकारात्मक पाऊल; शेकडो ग्रामस्थांचा निर्धार

पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या पुढाकारातून व्यसनमुक्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
हिमायतनगर, अनिल मादसवार| “व्यसन सोडू… कुटुंब वाचवू” हा संदेश देत हिमायतनगर तालुक्यातील वाघी येथे आयोजित व्यसनमुक्ती शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या प्रेरणेतून १३ व १४ जुलै रोजी आयोजित या उपक्रमात अनेक नागरिकांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला.

शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना होमिओपॅथिक औषधांचे वितरण, समुपदेशन आणि व्यसनमुक्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. दारूच्या व्यसनामुळे कुटुंब, आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर होणारे गंभीर परिणाम समजावून सांगत पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी प्रत्येकाने व्यसनमुक्त जीवन स्वीकारण्याचे आवाहन केले.

oplus_140509186

“प्रत्येक गाव व्यसनमुक्त झाले, तर समाज अधिक निरोगी, सुरक्षित आणि सुसंवादी बनेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले. शिबिरादरम्यान अनेक नागरिकांनी कायमस्वरूपी दारू सोडण्याची शपथ घेतली. यावेळी डॉक्टर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडे, पोलीस पाटील संतोष खांडरे, विठ्ठलराव देशमवाड तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागात पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेली व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम प्रभावी ठरत असून, अनेक गावांमध्ये अवैध दारू विक्रीवरही मोठ्या प्रमाणात आळा बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!