



अखेर तो बहुप्रतीक्षित क्षण आला. समोर मातेच्या तीन पवित्र पिंडींचे दर्शन होताच हात आपोआप जोडले गेले. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या त्या दिव्य रूपासमोर उभे राहून मी एकच प्रार्थना केली— “हे जगन्माते, माझ्या परिवारावर, सहप्रवाशांवर आणि समाजातील सर्व गरजू बांधवांवर तुझी कृपा राहू दे. माझ्या हातून आयुष्यभर समाजसेवा घडू दे.आमच्या ग्रुप मधील दवाखान्यात ऍडमिट असलेल्या भारत चव्हाण यांना त्वरित बरे कर ” दर्शन काही क्षणांचे होते, पण त्या काही क्षणांनी मन कायमचे तृप्त झाले.



दर्शनानंतर सर्वजण बाहेर एकत्र आलो. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. काहींनी प्रेमाने मिठी मारत, “दिलीपभाऊ, तुमच्यामुळे हा योग आला,” असे सांगितले. मी त्यांना एवढेच उत्तर दिले, “हे माझे नव्हे, मातेचे बोलावणे आहे. ती बोलावल्याशिवाय इथे कुणीच येत नाही.” त्या क्षणी यात्रेचा खरा अर्थ पुन्हा उमगला.यानंतर रोपवेने भैरवनाथाच्या मंदिराकडे प्रस्थान केले. आकाशातून दिसणारा त्रिकूट पर्वत, दूरवर दिसणारे भवन, खोल दऱ्या आणि नागमोडी मार्ग पाहताना निसर्गाच्या वैभवापुढे शब्दच हरवून गेले. भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर यात्रा पूर्ण झाल्याचे समाधान स्पष्ट दिसत होते.


या यात्रेत प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार प्रवासाचा पर्याय निवडला. माझी चार नातवंडे अर्णव, ईशानी, अविका आणि श्रावणी यांना जाताना व परतताना बाबागाडीतून नेण्यात आले.अपर्णा व विश्राम कुंटूरकर, दादाराव व संध्या कदम, प्रियंका व दिग्विजय दुर्गे, प्रशांत व शर्मिला होट्टे, श्रीराम व मेघा पाठक, लक्ष्मी मठपती, हणमंत मारवाडे, प्रसाद पवार, प्रमोद पुण्यपवार, जयंत लोखंडे, साईप्रसाद हळदे, संतोष दराडे, माधवी बाटवे, अन्नपूर्णा खराणे, सुषमा मोरे आणि गंगाधर मुंगल यांनी जाताना पायी, भैरवनाथाचे दर्शन केबल कारने आणि परतीचा प्रवासही पायी पूर्ण केला.


प्रल्हाद व सुचित्रा नवघरे, गुलाब व कांचन इंगोले, दीपक दुर्गे, सारिका गवळी, गौरी, सुभाष , मदनेश्वरी आणि साईप्रसाद देवकते यांनी जाताना व येताना घोड्याचा, तर भैरवनाथासाठी केबल कारचा पर्याय निवडला.नारायण व शोभा चव्हाण, श्रीकांत आकोलकर, सुनिता प्र. देशमुख, जयंत व विद्या आडे, सुनिता देशमुख, मेघा धर्मापुरीकर, जयश्री ठाकूर, नेहा राजपूत आणि पूजा चौहान यांनी संपूर्ण यात्रा डोलीतून पूर्ण केली. छाया आणि संजय चौधरी यांनी संपूर्ण प्रवास घोड्यावरून केला.राधा व किशनराव चव्हाण, संजय आणि संगीता खुपसे यांनी जाताना पायी तर परतीच्या प्रवासात घोड्याचा आधार घेतला. अर्चना आणि नागोराव डिग्रसे यांनी जाताना घोड्यावरून प्रवास केला, भैरवनाथाचे दर्शन केबल कारने घेतले आणि परतीचा प्रवास पायी पूर्ण केला.
या संपूर्ण यात्रेची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार योग्य पर्याय निवडला, पण कोणाच्याही दर्शनात उणीव राहिली नाही. कुणी पायी चालले, कुणी घोड्यावरून गेले, कुणी डोलीचा आधार घेतला, तर लहानग्यांनी बाबागाडीचा; पण शेवटी सर्वजण समान श्रद्धेने मातेच्या चरणी आणि भैरवनाथाच्या मंदिरात नतमस्तक झाले.सायंकाळी बाणगंगेत परतल्यावर शरीर थकले होते, पण मन विलक्षण शांत झाले होते. दिवसभराच्या चढ-उतारानंतर सर्वजण हॉटेलवर परतलो. तेथे दरवर्षीप्रमाणे श्री. नवनाथ सोनवणे (उदगीरकर) यांच्या वतीने सर्व यात्रेकरूंसाठी प्रेमाने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यांच्या या अन्नदान सेवेचे यंदा रौप्यमहोत्सवी २५ वे वर्ष पूर्ण झाले. सलग पंचवीस वर्षे माता वैष्णोदेवीच्या यात्रेतील भाविकांना निःस्वार्थ भावनेने भोजन देण्याची त्यांनी जपलेली परंपरा खरोखरच प्रेरणादायी आहे. दिवसभराचा सर्व थकवा त्या प्रेमाने वाढलेल्या भोजनामुळे क्षणात नाहीसा झाला. सर्व यात्रेकरूंनी त्यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.आजच्या मिनरल वॉटर ची व्यवस्था प्रशांत व संगिता जोशी यांच्या तर्फे होती.
जेवणानंतर सर्वजण एकत्र बसून दिवसातील अनुभव सांगू लागले. कुणाला पिंडीसमोर आलेले अश्रू आठवत होते, कुणी रोपवेमधून दिसलेला निसर्ग सांगत होते, तर कुणी ढोलाच्या तालावर झालेली चढाई पुन्हा अनुभवत होते. त्या गप्पांमध्ये एक गोष्ट मात्र प्रत्येकाने मान्य केली—ही केवळ डोंगर चढण्याची यात्रा नव्हती; ती श्रद्धा, सेवा, मैत्री आणि माणुसकीचा अविस्मरणीय उत्सव होती. (क्रमश:)
