
जलसंपदा, शेती, उद्योग आणि पर्यटनाची सांगड घालण्याची गरज; एसआरटीएम विद्यापीठात विशेष व्याख्यान
नांदेड | मराठवाड्याकडे सुपीक जमीन, जलसंपदा, कुशल मनुष्यबळ, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनाची मोठी क्षमता असून कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान आणि वारसा पर्यटन यांची प्रभावी सांगड घातल्यास हा प्रदेश महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा सिंचन प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी उपाध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) माधव भंडारी यांनी केले.



स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्ययन केंद्रातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘मराठवाडा : काल, आज व उद्या’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. भंडारी यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे जायकवाडी आणि विष्णुपुरीसारखे महत्त्वाचे सिंचन प्रकल्प साकार झाले. या प्रकल्पांमुळे मराठवाड्याची भीषण परिस्थिती टळली आणि शेती विकासाला नवी दिशा मिळाली.



मराठवाड्याचा इतिहास हजारो वर्षांचा असून तेर आणि भोगवर्धनसारखी प्राचीन व्यापारी केंद्रे ग्रीस आणि रोमपर्यंत व्यापार करत होती. कापूस, वस्त्रनिर्मिती, काच वस्तू, मणी, रंगद्रव्ये आणि कृषी प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीचे पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. बारवांसारख्या पारंपरिक जलव्यवस्थापन पद्धतींचा उल्लेख करत त्यांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले. यादव काळात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाल्याने भाषेच्या विकासालाही मोठी चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.


रोजगारासाठी युवक शहरांकडे स्थलांतर करत असले, तरी भविष्यात सुशिक्षित युवक पुन्हा शेतीकडे वळतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी शेतीला प्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेशी जोडण्याची आवश्यकता अधोरेखित केली. केळी, कापूस, कडधान्ये आणि तेलबिया आधारित उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत बोलताना रेणुकामाता, अंबाजोगाई, तुळजाभवानी, औंढा नागनाथ, देवगिरी किल्ला तसेच मराठवाड्यातील ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रभावी संवर्धन व विपणन केल्यास हा प्रदेश देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.


अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले, “जोपर्यंत मराठवाड्यात पाणी वाहत राहील, तोपर्यंत डॉ. शंकरराव चव्हाण यांचे योगदान स्मरणात राहील. जायकवाडी आणि विष्णुपुरीसारखे सिंचन प्रकल्प त्यांच्या दूरदृष्टीची जिवंत स्मारके आहेत.”

कार्यक्रमाच्या प्रारंभी छायाचित्रकार विजय होकर्णे निर्मित ‘गोदाकाठचा महान कर्मयोगी’ या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ आणि डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्रदादा चव्हाण, डॉ. प्रशांत पेशकार, नारायण चौधरी यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
