
“जय माता दी”च्या जयघोषात… कटऱ्यापासून भवनापर्यंत श्रद्धेची अविस्मरणीय चढाई! – रात्रभराच्या प्रवासानंतर शरीराला विश्रांतीची गरज होती, पण मनाला मात्र झोप कुठे होती? कारण आजचा दिवस होता जगप्रसिद्ध माता वैष्णोदेवीच्या दर्शनाचा! बहुतेक हे माझे 31 वे माताराणी चे दर्शन असावे. बाबा बर्फानींच्या पवित्र गुहेत नतमस्तक झाल्यानंतर आता त्रिकूट पर्वतावर विराजमान असलेल्या जगन्मातेच्या चरणी माथा टेकविण्याचा योग आमच्या संपूर्ण परिवाराला लाभणार होता. पहाटे चार वाजताच हॉटेल ग्रँड शरणमध्ये प्रत्येक खोलीत हालचाल सुरू झाली. कुणी खोलीतील केटलमध्ये चहा बनवत होते, कुणी गरम पाण्याने स्नान करून तयार होत होते, तर कुणी एकमेकांच्या दरवाजावर टकटक करून, “चला… वेळ झाली!” अशी हाक देत होते. नऊ दिवसांपासून एकत्र राहिलेल्या या शंभर जणांच्या परिवारात आता औपचारिकतेचा लवलेशही उरला नव्हता. कोणाचे औषध कोणाकडे आहे, कोणाचा मोबाईल चार्जिंगला लावायचा आहे, कोणाची बॅग खाली न्यायची आहे, कोणाला चहा आधी द्यायचा आहे, यासाठी कुणालाही सांगावे लागत नव्हते. रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती किती घट्ट असू शकतात, याचा प्रत्यय या यात्रेने प्रत्येकाला दिला होता.



बरोबर पाच वाजता आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो. चार जणांसाठी तीनशे रुपये देऊन ऑटोने कटरा येथील यात्रा नोंदणी केंद्र गाठले. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असे. पण यंदाची व्यवस्था अत्यंत आधुनिक आणि वेगवान होती. आधार कार्ड दाखवताच अवघ्या एका मिनिटात प्रत्येकाच्या गळ्यात आरएफआयडी कार्ड आले. यात्रेतील सुरक्षिततेसाठी करण्यात आलेली ही व्यवस्था पाहून समाधान वाटले. कार्ड गळ्यात घालून आम्ही पुन्हा ऑटोने बाणगंगेकडे निघालो. तेथून पुढे कोणत्याही वाहनाला परवानगी नसल्यामुळे खरी यात्रा तेथूनच सुरू होणार होती.



बाणगंगेत पोहोचल्यावर सर्वांनी प्रथम त्रिकूट पर्वताकडे पाहून हात जोडले. हजारो भाविकांची वर्दळ सुरू होती. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भक्त, विविध भाषा, विविध वेशभूषा, वेगवेगळ्या संस्कृती; पण सर्वांच्या ओठांवर एकच घोषणा—“जय माता दी!” आम्ही सर्वांनी अमरनाथ यात्री संघाचे एकसारखे टी-शर्ट आणि कॅप परिधान केल्यामुळे आमचा नांदेडचा समूह गर्दीतही सहज ओळखू येत होता. त्या क्षणी मी मनोमन एकच प्रार्थना केली—“हे माते, या परिवारातील प्रत्येक यात्रेकरूला सुखरूप दर्शन घडव आणि सर्वांना आनंदाने परत आण.”


यानंतर नियोजनाप्रमाणे यात्रेकरूंचे तीन गट करण्यात आले. काही जण माझ्यासोबत पायी येणार होते. काहींनी घोड्याचा पर्याय निवडला, तर ज्येष्ठ नागरिक आणि चालण्यास अडचण असलेल्यांसाठी डोलीची व्यवस्था करण्यात आली. घोड्यासाठी साडेचार हजार रुपये आणि डोलीसाठी आठ हजार रुपये असा दर बराच वेळ घासाघीस करून निश्चित केला. यात्रेचे यश केवळ श्रद्धेवर अवलंबून नसते; त्यामागे काटेकोर नियोजन, अनुभव आणि योग्य निर्णय यांचाही मोठा वाटा असतो.


गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एक आगळीवेगळी परंपरा जपत आलो आहोत. वैष्णोदेवीची चढाई ढोलाच्या गजरात सुरू करण्याची! मी आधीच कळवले असल्यामुळे आमचे नेहमीचे ढोलवादक आमची वाट पाहत उभे होते. मला पाहताच विजय ढोलवाला हसत पुढे आला आणि म्हणाला, “भैय्याजी, हर दिन हजारों भक्त आते हैं, मगर आप अकेले इंसान हो जो हर साल ढोल बजाते हुए माता का दर्शन करते हो। इसलिये हम आपको हमेशा याद करते हैं.” त्याचे हे शब्द ऐकून मन भरून आले. यात्रेत हजारो लोक येतात आणि जातात; पण आपल्या वागण्याने, प्रेमाने आणि जपलेल्या परंपरेमुळे कोणाच्या तरी मनात कायमची जागा निर्माण होते, हीच खरी कमाई असते.
क्षणात ढोलांचा नाद दुमदुमला. “प्रेम से बोलो… जय माता दी!”, “जोर से बोलो… जय माता दी!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आमचा ताफा ढोलाच्या तालावर पुढे सरकत होता आणि हजारो भाविक आश्चर्याने आमच्याकडे पाहत होते. अनेकांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ टिपले, काही जण आमच्या घोषणांमध्ये सहभागी झाले, तर काहींनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्या वातावरणात थकवा, अंतर आणि चढाई या शब्दांचा विसर पडला होता. प्रत्येक पावलागणिक भक्तिभाव अधिकच जागृत होत होता.
मी सर्वांना आधीच सांगितले होते की, “जे पायी चालणार आहेत त्यांनी वाटेत कोणताही खाऊ किंवा पेय विकत घेऊ नये. आपल्या परिवारात अशी माणसे आहेत की कोणालाही काही कमी पडू देणार नाहीत.” आणि काही वेळातच माझे शब्द खरे ठरले. साधारण अर्धा तास चालल्यानंतर पहिल्या विश्रांतीच्या ठिकाणी आम्ही थांबलो. तेवढ्यात अर्चना विश्वास कुंटूरकर यांनी तात्काळ तीन हजार रुपये दिले. डोंगराच्या चढाईत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यानंतर तर जणू सेवाभावाचीच स्पर्धा सुरू झाली. नरसादेवी ताटपल्लेवार, सपना अग्रवाल, प्रसाद पवार आणि जयवंत लोखंडे यांनी पुढील विश्रांतीच्या ठिकाणी सर्वांसाठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यासाठी आनंदाने आर्थिक योगदान दिले. कोणी फळे देत होते, कोणी चहा, कोणी ज्यूस, तर कोणी अल्पोपहार. हे केवळ खाण्याचे वाटप नव्हते; हा एकमेकांवरील प्रेमाचा आणि सेवाभावाचा उत्सव होता. अशा प्रसंगांमुळेच यात्रा धार्मिक मर्यादेपलीकडे जाऊन माणुसकीचा सोहळा बनते.
चढाई जसजशी वाढत होती तसतसे पाय जड होऊ लागले. सुरुवातीचा उत्साह कायम असला तरी शरीर थकव्याची जाणीव करून देत होते. मात्र प्रत्येक वळणावर घुमणारा “जय माता दी”चा जयघोष, ढोलाचा दमदार ताल आणि सहप्रवाशांचा उत्साह पुन्हा नव्या जोमाने पुढे चालायला प्रेरणा देत होता. एखादा यात्रेकरू दमला की दुसरा त्याचा हात धरत होता. कोणाची बॅग जड झाली की तिसरा ती खांद्यावर घेत होता. कोणाला पाण्याची गरज भासली की बाटली पुढे करणारे हात क्षणाचाही विलंब करत नव्हते. त्या दिवशी मला पुन्हा एकदा जाणवले की, यात्रेचे खरे बळ पायांत नसते; ते एकमेकांबद्दलच्या प्रेमात असते.
मार्गातील निसर्गही तितकाच मोहक होता. एका बाजूला हिरव्यागार पर्वतरांगा, दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या, मधूनच ढगांच्या आडून डोकावणारे सूर्यकिरण आणि सतत पुढे सरकणारी भाविकांची अखंड रांग—जणू श्रद्धेचीच एक नदी पर्वतावरून वाहत होती. काही जण घोड्यावरून पुढे जात होते, काही डोलीतून, काही पिट्ठूच्या मदतीने, तर बहुसंख्य यात्रेकरूंनी पायी चालण्याचा निर्धार केला होता. प्रत्येकाचा मार्ग वेगळा होता; पण ध्येय एकच होते—मातेच्या दरबारात नतमस्तक होणे.
या चढाईदरम्यान माझ्यासाठी सर्वात भावनिक क्षण वेगळाच होता. माझ्यासोबत माझी नातवंडे बाबा गाडीत होती. बाबा गाडी ढकलणारे पिट्ठू इतक्या वेगाने चालत होते की त्यांच्यासोबत पावले जुळवताना माझी चांगलीच दमछाक होत होती. तेवढ्यात मन तीस वर्षे मागे गेले. सन १९९७ मध्ये मी प्रथमच माझ्या पत्नी आणि दोन लहान मुलींसोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला आलो होतो. त्या वेळी दोन्ही मुलींना पिट्ठूंनी खांद्यावर घेतले होते आणि त्यांच्या मागे चालताना मी अक्षरशः धापा टाकल्या होत्या. त्या वेळी मी तरुण होतो, अंगात जोम होता. आज जवळपास तीस वर्षांनंतर पुन्हा तोच प्रसंग समोर होता. फरक एवढाच होता की त्या वेळी माझ्यासोबत माझ्या दोन मुली होत्या आणि आज त्यांच्या दोन-दोन लेकरांसोबत मी त्याच मार्गाने चालत होतो. काळाने पिढ्या बदलल्या, माझे केस पांढरे झाले, शरीरावर वयाची छाप उमटली; पण मातेच्या दरबाराकडे जाणाऱ्या पावलांतील श्रद्धा मात्र अजूनही तितकीच तरुण होती.
चढाईचा शेवटचा टप्पा सुरू झाला आणि ढोल पुन्हा घुमू लागले. “तुने मुझे बुलाया है शेरांवालिये…” या गीताच्या तालावर आमच्या समूहाने पुन्हा एकदा जल्लोष केला. हजारो भाविक आमच्याकडे पाहत होते. अनेक जण आमच्या घोषणांमध्ये सामील झाले. नकळत थकवा दूर झाला आणि पावले वेगाने पडू लागली. गाणी, घोषणा, हशा, भक्तिभाव आणि माणुसकीची ऊब सोबत घेत आम्ही अवघ्या साडेचार तासांत माता वैष्णोदेवीच्या पवित्र भवनापाशी पोहोचलो.भवनाचे पहिले दर्शन होताच सर्वांनी एकाच स्वरात घोषणा दिली—“प्रेम से बोलो… जय माता दी!” त्या क्षणी डोळे नकळत मिटले, हात आपोआप जोडले गेले आणि मनात एकच भावना दाटून आली—मातेने बोलावले म्हणूनच हा इतका प्रवास पूर्ण झाला.आता फक्त इतक्या गर्दीत सर्वांचे दर्शन व्यवस्थित होऊ दे. (क्रमश 🙂
